सिंहगडावर दोन वर्षात ‘रोप वे’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

का हवा ‘रोप-वे’ 
  सिंहगडाच्या पर्यटन विकासासाठी
  हजारो पर्यटक सिंहगडला दर शनिवार, रविवार भेट देतात.
  गडावर होणारी वाहतूक कोंडी यातून फुटेल
  स्थानिक तरुणांना रोजगाराची वेगवेगळी साधने उपलब्ध होतील.

पुणे - ‘रोप वे’चा अनुभव घ्यायचा, तर पुणेकरांना रायगडचा रस्ता धरावा लागत होता. पण, आता ही परिस्थिती बदलत आहे. बहुप्रतीक्षित असलेल्या सिंहगडच्या ‘रोप वे’ला अखेर अंतिम मंजुरी मिळाली आहे. गेली पंधरा वर्षे वेगवेगळे परवाने, ना-हरकत प्रमाणपत्र, जागा हस्तांतर यांतून हा प्रवास झाला आहे. येत्या सप्टेंबरपासून याचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. 

रायगडच्या धर्तीवर पुणे परिसरातील पर्यटन विकास करण्यासाठी सिंहगडावर ‘रोप वे’ करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्रकारच्या परवानग्या घेता-घेता सुरवातीची नऊ वर्षे गेली. त्यानंतर सिंहगडाच्या पायथ्याला असलेल्या आतकरवाडीत जिथे ‘रोप वे’चे केंद्र असणार होते. त्या जागेला गावठाणाचा दर्जा नव्हता. त्यामुळे परत ‘रोप वे’ अडकला होता. त्या जागेचा प्रश्‍न आता सुटला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडी) यांनी या जागेला गावठाणाचा दर्जा दिला आहे. 

सिंहगडावर रोप वे सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प ११६ कोटी रुपयांचा आहे. त्यासाठी आवश्‍यक सर्व परवानग्याही देण्यात आल्या आहेत. आतकरवाडी येथील जागेचाही प्रश्‍न सोडविण्यात आला आहे.
- किरण गित्ते, आयुक्त,  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

रोप वे प्रकल्पाच्या उभारणीसाठी ‘पीएमआरडीए’ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी मोलाची मदत केली. काम पावसाळ्यानंतर सुरू केले जाणार असून, पुढील दोन वर्षांमध्ये पूर्ण होईल. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.
- उदय शिंदे, व्यवस्थापकीय संचालक, शिवाई रोप वे फाउंडेशन
 

बांधकामासाठी हेलिकॉप्टरचा वापर
सिंहगड ‘रोप वे’साठी ऑस्ट्रियन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. सुरक्षिततेला यात सर्वाधिक प्राधान्य आहे. याचे बांधकाम करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्याची परवानगीही मागितली जाणार आहे. त्यामुळे हे काम लवकर पूर्ण होईल. गडावरील आणि गडाच्या पायथ्याचे केंद्र ऐतिहासिक वास्तूप्रमाणे उभारण्यात येणार आहे.

असा असेल ‘रोप वे’
 आतकरवाडी येथून ‘रोप-वे’ सुरू होणार
 पुणे दरवाजालगतच्या दूरदर्शनच्या टॉवरपर्यंत ‘रोप-वे’ असेल
 १.८ किलोमीटरचा प्रवास ‘रोप वे’ने करता येणार
 गडावर सुमारे पाच ते सात  मिनिटांत पोचता येणार

१०००  पर्यटक एका तासाला वाहून नेण्याची क्षमता
३२ एकूण ट्रॉली
१६ ट्रॉली एका दिशेने एका वेळी

Web Title: marathi news Sinhagad Rope Way pune