अन्न व नागरी पुरवठा विभागाचे विशेष सचिव निखिलेश झा यांची विघ्नहर कारखान्यास भेट

दत्ता म्हसकर
बुधवार, 13 डिसेंबर 2017

जुन्नर : भारत सरकार अन्न व नागरी पुरवठा मंत्रालायाचे विशेष सचिव तथा कृषी मंत्रालय नवी दिल्लीचे वित्तीय सल्लागार निखिलेश झा यांनी मंगळवार (ता.१२) जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला भेट दिली.

जुन्नर : भारत सरकार अन्न व नागरी पुरवठा मंत्रालायाचे विशेष सचिव तथा कृषी मंत्रालय नवी दिल्लीचे वित्तीय सल्लागार निखिलेश झा यांनी मंगळवार (ता.१२) जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला भेट दिली.

 सहकारी साखर कारखानदारी सध्या अत्यंत अडचणीच्या परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असून साखरेचे व उपपदार्थाचे दर कमी होत आहेत. अशा परिस्थितीत सभासद व ऊस उत्पादकांना एफ. आर. पी. प्रमाणे ऊसभाव देणे कायद्याने बंधनकारक असल्याचे कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी निखिलेश झा यांच्यासमोर साखर कारखान्यांच्या अडचणी मांडताना सांगितले. 
कारखान्यांनी उत्पादित केलेल्या साखर आणि उपपदार्थांना चांगल्याप्रकारे बाजारभाव मिळाला तरच शेतकऱ्यांच्या ऊसाला कारखाने चांगला बाजारभाव देऊ शकतील. तसेच कारखान्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होईल. याबाबत शासनाने लक्ष घालण्याची गरज असून साखर व उपपदार्थांचे बाजारभाव सुधारण्याकरीता प्रयत्न केले गेले पाहिजेत. साखर व उपपदार्थांना चांगला बाजारभाव मिळाल्यास साखर कारखान्यांवर कर्जाचा बोजा वाढणार नाही व कारखाने आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होणार असल्याचे सांगून ज्याप्रमाणे केंद्रशासन ऊसाची एफ. आर. पी. ठरविते त्याचपद्धतीने साखर व उपपदार्थांची आधारभूत किंमत ठरविणेही गरजेचे असल्याचे सत्यशिल शेरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

विघ्नहर कारखान्यास हंगाम २०१६-१७ साठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बुद्रुक, पुणे या संस्थेकडून महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना म्हणून कै. वसंतदादा पाटील पारितोषिक मिळाले तसेच तांत्रिक कार्यक्षमतेचे उच्च साखर उतारा विभागातील संपूर्ण देशातील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांचेकडून देण्यात आले. कारखाना पारदर्शक व काटकसरीने चालविल्यामुळे विघ्नहर कारखान्यास ही बक्षिसे मिळाली असून भारतीय शुगर या देशपातळीवरील संस्थेने विघ्नहरने मिळविलेल्या यशाबद्दल 'युथ आयकॉन ऑफ शुगर इंडस्ट्रीज' हा किताब देऊन चेअरमन सत्यशिल शेरकर यांचा गौरव केला. याविषयीची निखिलेश झा यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली व विघ्नहरच्या पारदर्शक आणि काटकसरीच्या कारभाराचे कौतुक करून सत्यशिल शेरकर यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. 

यावेळी सहकारी साखर कारखानदारीच्या अडचणींबाबत विस्तृत अशी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले व अधिकारी वर्गाने चर्चेत सहभाग घेतला. यावेळी स्पेशल ऑडीटर अनिल सोनवणे हे उपस्थित होते. भेटी दरम्यान भारत सरकार अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे विशेष सचिव तथा वित्तीय सल्लागार कृषी मंत्रालय नवी दिल्लीचे निखिलेश झा यांनी साखर कारखाना, को-जनरेशन प्रकल्प, तसेच डिस्टलरी प्रकल्पाची पाहणी करून कारखाना कामकाज व कारखाना राबवित असलेल्या विविध उपक्रमांबद्दल कौतुक केले व कारखान्याच्या हंगामाकरीता शुभेच्छा दिल्या.

Web Title: Marathi news Special Secretary Food and Civil Supplies Nikhilesh Jha visited the Wighnahar plant