आत्महत्या रोखण्यासाठी संरक्षक जाळी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

पुणे - जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जाळी बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयापाठोपाठ नव्याने उभारलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातही खबरदारीचा उपाय म्हणून संरक्षक जाळी बसविण्यात येणार आहे. 

पुणे - जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जाळी बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयापाठोपाठ नव्याने उभारलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातही खबरदारीचा उपाय म्हणून संरक्षक जाळी बसविण्यात येणार आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाची पाच मजली सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. ‘ए’ आणि ‘बी’ विंग यात आहेत. तसेच, मध्य भागी आकर्षक अशी अजून एक विंग साकारण्यात आली आहे. या इमारतीच्या लोखंडी कठड्यावरून तोल जाऊन नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी संरक्षक जाळी बसविण्यात येणार आहे. मंत्रालयाच्या इमारतीवरून काही दिवसांपूर्वी एका नागरिकाने आत्महत्या केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वास्तुविशारद यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा सुरू होती. 

या जाळ्यांमुळे इमारतीच्या सौंदर्याला धक्का बसेल, असे मत वास्तुविशारदांनी व्यक्त केले होते. मात्र, इमारतीच्या सौंदर्यापेक्षा नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन जाळी बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुढे आली. 

याबाबत निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे म्हणाले, ‘‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर जाळी बसविण्यात येणार आहे. त्यासाठी मापे घेण्यात आली आहेत. इमारतीच्या कठड्यावरून पडून नागरिकांना इजा होऊ नये, यासाठी हा खबरदारीचा उपाय करण्यात येत आहे.’’

या कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे. त्यास मान्यता मिळाल्यावर कामाला सुरवात केली जाणार आहे. मंत्रालयात बसविलेल्या जाळ्यांप्रमाणे या इमारतीला जाळ्या बसविण्यात येणार आहेत, असे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले. 

Web Title: marathi news Suicide Preventory pune collector office