संक्रांतीला लागणाऱ्या सुगडं, वाणावर मंदीची संक्रांत

गणेश बोरुडे
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

तळेगाव : आधुनिकतेच्या ट्रेंडमध्ये पारंपारिक सणोत्सवांच्या चालीरितींमध्ये बदल होत चालला आहे. कधीकाळी मकरसंक्रांतीला सुवासिनींकडून विशेष मान मिळणाऱ्या सुगडं आणि वाणावर गतवर्षीच्या तुलनेत यंदा मंदीची संक्रांत आणखी उग्र झाल्याचे पहावयास मिळत आहे.

तळेगाव : आधुनिकतेच्या ट्रेंडमध्ये पारंपारिक सणोत्सवांच्या चालीरितींमध्ये बदल होत चालला आहे. कधीकाळी मकरसंक्रांतीला सुवासिनींकडून विशेष मान मिळणाऱ्या सुगडं आणि वाणावर गतवर्षीच्या तुलनेत यंदा मंदीची संक्रांत आणखी उग्र झाल्याचे पहावयास मिळत आहे.

मकरसंक्रांत म्हणजे पिक काढून अन्नधान्याने शेतकऱ्यांच्या कणगी भरल्याचे प्रतीक. मकर संक्रांत ही उन्हाळ्याची सुरुवात आहे. हिंदू धर्म संस्कृतीत मकरसंक्रांत हा पौष महिन्यातील महत्त्वाचा सण. मात्र, आधुनिकतेच्या लाटेत शहरी भागात निष्प्रभ होत चाललेल्या सणोत्सवांच्या यादीत मकरसंक्रांत देखील अग्रस्थानी असल्याचे चित्र आहे. मकरसंक्रांत म्हणजे भोगीचे बारा विविध भाज्यांचे कालवण, अन्नपदार्थात हावरीचे तीळ, हिरवा चुडा, ओवसा-सुगडं. मात्र अलिकडे "तीळगुळ घ्या गोडगोड बोला" या व्हॉट्सअॅपवरील मेसेजपुरताच अस्तित्वाला उरल्याचे जाणवते. 

दशकभरापुर्वी संक्रांतीच्या आठवडाभर तेजी राहत असलेल्या तळेगाव स्टेशनच्या बाजारात, यंदा केवळ बोटावर मोजण्याइतकेच सुगडं-खण विक्रेते दिसतात. बोळके-सुगडं बनवण्याचे चाक कुंभारवाडयातून लोप पावल्यामुळे शेजारी नवलाख-उंबरे, कासारसाईच्या कुंभाराने चाकावर बनवलेले सुगडं हजारी २ हजार रुपये दराने आणून तळेगावच्या बाजारात विकून, प्रपंच चालवण्यासाठी वेळ आसामी करणाऱ्या कुंभार कुटूंबांवर आली आहे. पाच सुगडांचा एक खण वीस ते पंचवीस रुपयालाही घ्यायला महिला कानकूस करतात. ने-आण करताना लागणारा वाहतूक खर्च, होणारी तुटफुट पाहता तेही परवडत नसल्याचे विक्रेत्या अलका दरेकर यांनी सांगितले. 

काळानुरुप सणवार आणि संस्कृतीचे महत्त्व कमी होत चालल्यामुळे आजचा बहुतांशी आधुनिक महिलावर्ग सुगडं खरेदीला येतच नाही. त्यामुळे मंदीचे वातावरण असल्याचे अंजना राजपुरे म्हणाल्या. स्वीट होम-मॉलमधल्या आधुनिक सुगंधी रेवडी, तीळवडयांमुळे पारंपारिक साखरेचे पांढरे तीळगुळ देखील जास्त विकले जात नाहीत असे तीळगुळ विक्रेत्या जयबू तांबोळी म्हणाल्या. वाणासाठी लागणारा ओला हरभरा, ऊस, गाजर, गव्हाच्या ओंब्या, भुईमूग, बोरं, हुरडा, बिब्याची फुलं आणि तत्सम गावरान चीजवस्तू शोधूनही सापडेनाश्या झाल्यात. विक्रीला येणारी सुगडं देखील नुसत्या पारंपारिक मातीऐवजी कृत्रिम रंग, चमकी लावलेली दिसली. फ्लॅटची फॅब्रीकेटेड दारं सताड बंदच असल्यानं पूर्वीचा संक्रांत सांगणाऱ्या भटजींचं येणंजाणं बंद झालं. फॅन्सी बांगड्यांच्या शिरकावामुळे पारंपारिक काचेच्या बांगड्यांचा चुडा हाती भरायला आलेली सुवासिनी देखील अभावानेच आढळते. एकंदरीतच ओवसण्याची सुगडं, वाण खरेदीचा कल कमी झाल्याने संक्रांतीच्या पूर्वसंध्येला बाजारात अपेक्षित तेजी जाणवत नाही. उद्या हेच पारंपारिक वाण-खण केवळ पुरातन वस्तू संग्रहालयात पहावयाला मिळाल्यास नवल नको.

 

Web Title: Marathi news talegao news sankrant festival