तळेगाव-शिक्रापूर महामार्ग ‘ज्वालामुखी’च्या तोंडी

LPG-Gas
LPG-Gas

तळेगाव दाभाडे - तळेगाव ते शिक्रापूर दरम्यान असलेल्या तीन एलपीजी गॅस बॉटलिंग प्लांटसाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसची वाहतूक तळेगाव-चाकणमार्गे टॅंकरद्वारे होते. रस्त्याची दयनीय अवस्था, गॅस कंपन्यांचे सुरक्षेकडे दुर्लक्ष आणि गॅसवाहक चालकांच्या बेफिकिरीमुळे वाहतूक कोंडीने ग्रस्त तळेगाव-चाकणवर कायम धोक्‍याची टांगती तलवार आहे. दुर्दैवाने काही दुर्घटना घडल्यास मोठी जीवित आणि वित्त हानी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

खेड तालुक्‍यातील म्हाळुंगे येथे हिंदुस्थान पेट्रोलियम आणि रासे येथे इंडियन ऑइल आणि शिरूर तालुक्‍यातील पिंपळे जगताप येथे भारत गॅस असे पंचवीस किलोमीटरच्या आत तीन एलपीजी गॅस बॉटलिंग प्लांट अर्थात छोटे सिलिंडर भरण्याचे प्रकल्प कार्यान्वित आहेत. पैकी म्हाळुंगेचा एचपी गॅस प्रकल्प ऐन वर्दळीच्या चाकण एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राच्या ऐन मधोमध महामार्गाच्या अगदी लगत आहे. रासे येथील इंण्डेन गॅस प्लांट महामार्गाकडेला आणि भर मानवी वस्तीत आहे. पिंपळे जगताप येथील भारत गॅस प्रकल्प मुख्य रस्त्यापासून थोडा आत मात्र खासगी औद्योगिक क्षेत्राच्या गराड्यात आहे. कोकणातील उरण येथील संबंधित कंपन्यांच्या रिफायनरीमधून मोठ्या कॅप्सूल टॅंकरमध्ये भरून हजारो टन एलपीजी गॅस या बॉटलिंग प्लांटमध्ये आणला जातो. मग हा गॅस या प्रकल्पांमध्ये घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या छोट्या सिलिंडरमध्ये भरून विभागनिहाय सार्वजनिक वाटपासाठी वितरकांकडे पाठविला जातो. उरण रिफायनरीला जोडणारे जवळपास सर्वच मार्ग आता चौपदरी दुभाजकयुक्त झालेले असले तरी मुंबई-पुणे महामार्गावरून चाकण, शिक्रापूरला जाणारा मार्ग अद्यापही एकपदरी आणि अरुंद असल्यामुळे गॅसवाहकांसोबतच इतर वाहने आणि लोकवस्तीसाठी अतिधोकादायक असाच आहे. 

वाहनतळाचा अभाव
तिन्ही बॉटलिंग प्लांटकडे येणाऱ्या जाणाऱ्या गॅस टॅंकर आणि सिलिंडर वाहतुकीच्या गाड्यांची संख्या दिवसाला सुमारे पाचशेच्या वर जाते. वाहनांना पार्किंग नसल्याने गॅस वाहने रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला, हॉटेल ढाब्यांसमोर, मानवी वस्तीत किंबहुना जागा मिळेल तिकडे, निर्धास्तपणे दिवसेंदिवस उभी करून ठेवली जातात. 

जबाबदारी पोलिसांची की आरटीओची?
काही वर्षांपूर्वी माळवाडीत गॅस टॅंकरने पेट घेतला तेव्हा पाच किलोमीटरवरून आगडोंब दिसत होते. २०१२ द्रुतगती महामार्गावर झालेली गॅसगळती थांबत नव्हती. आता याबाबत तपासणीची जबाबदारी नेमकी पोलिसांची की आरटीओची? या बाबत प्रश्नच असल्याने परिसरावर धोक्‍याची टांगती तलवार कायम आहे.
 

अतिशय दयनीय अवस्था झालेल्या या रस्त्यामुळे अपघात झाल्यास संपूर्ण गाव आणि शेजारील उद्योग बेचिराख होऊ शकतात. या रस्त्याचे काम भारत गॅसने सीएसआर निधीतून करून उरणच्या धर्तीवर सुरक्षेसंदर्भात उपाययोजना कराव्यात.
- पुष्पा विजय जगताप, सरपंच, पिंपळे जगताप, ता. शिरूर, पुणे

कंपनीबाहेर जबाबदारी वाहतूकदाराची
गॅस टॅंकर प्लांटमध्ये आल्यानंतरच त्याच्या सुरक्षेची जबाबदारी कंपनीची असते. रस्त्यावरील सुरक्षेची जबाबदारी संबंधित वाहतूकदाराची असल्याचे हिंदुस्थान पेट्रोलियमच्या म्हाळुंगे-चाकण येथील सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अपघाताची कारणे
 

 अरुंद, खड्डेमय असलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यावर रहदारीचा धोकादायक ओघ 

 गॅस प्रकल्पांच्या गेटमधून वाहने अचानक वळण घेऊन आत-बाहेर करतात 

 ज्वालाग्रही पदार्थ चालकांना जवळ बाळगण्यास बंदी असताना, गॅस वाहनचालक विडी, सिगारेटचा धूर काढतात

 गॅसवाहक टॅंकर अथवा ट्रकचे इंडिकेटर्स, हेडलाइट, अग्निरोधक कार्यान्वित नसतात

 बहुतांशी चालक मद्यपान करून बेफिकिरीने भरधाव ही अतिज्वालाग्रही वाहतुकीची वाहने चालवितात 

 तीनही गॅस प्रकल्पातील सुरक्षा व्यवस्थापनाकडून बेफिकिरी 

 सुरक्षा पथक तातडीने पोचण्याचा अभाव

 जीवनावश्‍यक सेवा म्हणून पोलिसांकडून या वाहनांकडे दुर्लक्ष

 भारत गॅसच्या पिंपळे जगताप येथील प्रकल्पाकडे जाणारा रस्ता अतिशय खराब असल्याने अपघाताचा धोका

अत्यावश्‍यक उपाययोजना 
1 प्रतीक्षेतील गॅसवाहक ट्रक आणि टॅंकर्ससाठी पुरेशी आणि सुरक्षित ठिकाणी पार्किंग व्यवस्था. 

2 गॅसवाहक ट्रक आणि टॅंकर्स चालकांसाठी विश्राम खोल्यांची व्यवस्था.

3 ज्वालाग्रही पदार्थ गॅसवाहकांमध्ये न बाळगण्याच्या नियमांचे काटेकोर पालन. 

4 गॅसवाहक ट्रक आणि टॅंकर्स चालकांची प्रकल्पात जाता येता अल्कोहोल तपासणी.

5 गॅसवाहक ट्रक आणि टॅंकर्समध्ये अग्निरोधकासह आपत्कालीन उपाययोजना.

6 गॅसवाहक ट्रकचालकांना सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण.

7 गॅसवाहक गाड्यांची आरटीओकडून नियमित तपासणी.

8 हमरस्त्यांवरील पोलिसांकडून गॅसवाहक गाड्या आणि चालकांची नियमित तपासणी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com