...तर आम्हाला बारामतीत येऊन उद्घाटने करावी लागतील : आमदार संग्राम थोपटे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

"आम्ही केलेल्या कामाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करतील अशी आम्हाला आजिबात अपेक्षा नव्हती. परंतु त्यांनी तसे केले तरीही आम्ही शांत आहोत. आम्हाला रणांगण गाजविण्याची परंपरा असल्याचे सांगत अगामी लोकसभा निवडणुकीला त्यांना आमची गरज भासणार आहे'

भोर : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जर आम्हाला विश्वासात न घेता आमच्या तालुक्यातील आम्ही केलेल्या विकासकामांचे उद्घाटन करीत असतील तर आम्हालाही बारामतीत येऊन उद्घाटने 
करावी लागतील, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले. 

रविवारी (ता.२१) वीसगाव खोऱ्यातील नेरे येथील प्राथमिक आरोग्य केद्राच्या इमारतीचे व निवासस्थाचे उद्घाटन केल्यानंतर 
घेतलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी नेरे येथे सुमारे साडेचार कोटींच्या विकासकामांचे उद्घाटने व भूमिपूजने करण्यात आली. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र (२ कोटी २३ 
लाख), नेरे ते पाले-वरोडी रस्ता (५० लाख), आरोग्य केंद्राकडे जाण्यासाठी साकव (३५ लाख), नेरे-पाले रस्त्यावरील पूल (२५ लाख), ग्रामपंचायत रस्ता क्रॉक्रीटीकरण (५ लाख) आणि प्राथमिक शाळा संरक्षक भिंत (३ लाख) आदींचा समावेश आहे.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, जि.प. सदस्य विठ्ठल आवाळे, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, तालुका वैद्यकीय अधिकारी सूर्यकांत कऱ्हाळे, कृष्णाजी शिनगारे, महिलाध्यक्षा गीतांजली शेटे, गीतांजली आंबवले, नंदा गायकवाड, अनिल सावले, धनंजय वाडकर, पोपट सुके, 
मदन खुटवड, सुभाष कोंढाळकर, अमित दरेकर आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मागील महिन्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी नेरे-पाले-वरोडी रस्त्याच्या कामाचे व पुलाचे भूमीपूजन केले होते. रविवारी त्याच कामाचे भूमीपूजन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते पुन्हा करण्यात आले.

विरोधकांवर टीका करीत आमदार थोपटे म्हणाले, "आम्ही केलेल्या कामाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करतील अशी आम्हाला आजिबात अपेक्षा नव्हती. परंतु त्यांनी तसे केले तरीही आम्ही शांत आहोत. आम्हाला रणांगण गाजविण्याची परंपरा असल्याचे सांगत अगामी लोकसभा निवडणुकीला त्यांना आमची गरज भासणार आहे'', असे ते म्हणाले.

Web Title: Marathi news then we will start to inauguration at baramati says MLA sangram thopate