ढोल लेझीम पथकाच्या बिदागीतून साकारले मंदिर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

टाकवे बुद्रुक - आंदर मावळातील शेवटच्या टोकावर असलेल्या कुसूर गावातील हनुमान तरुण मंडळाने ढोल लेझीम पथकाच्या माध्यमातून मिळणाऱ्या बिदागीतून गावात विठ्ठल रखुमाईचे मंदिर उभारले आहे. वारकरी संप्रदायाची कास धरणाऱ्या कुसूर गावात विठ्ठल रखूमाईचे मंदिर नाही, याचे शल्य या तरुण पिढी पुढे होते. त्यासाठी त्यांनी पंचेचाळीस लाख रुपये खर्च करून हे मंदिर साकारले आहे. 

पंचवीस वर्षांपूर्वी गावातील तरुण पिढीने हनुमान तरुण मंडळाची स्थापना केली. धर्मादाय आयुक्तांकडे या मंडळाची रीतसर नोंदणी केली. मर्दानी खेळ म्हणून ओळख असणाऱ्या ढोल लेझीमचे पथक तयार केले. सुरवातीला पडकईवर भलर करून किंवा यात्राजत्रात ढोल लेझीमचा दमदार सराव केला. संघटनेच्या जोरावर उभारलेल्या पथकाला सण, समारंभ आणि जयंती उत्सवात मागणी वाढत गेली. पुणे, मुंबईतील गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवात ढोल लेझीम पथकांची मागणी पूर्ण करण्यास सुरवात केली. त्यातून वर्षाकाठी लाख रुपये उत्पन्न मिळविणाऱ्या मंडळाने गावातील भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करायला सुरवात केली. vvगावात ग्रामदैवत भैरवनाथ आणि मारुती मंदिर आहे. पण वारकरी संप्रदायाचे लेणं घेतलेल्या गावकऱ्यांना माथा टेकायला राऊळाची गरज आहे. हे लक्षात घेऊन तीन वर्षांत मंडळाने लोकसहभाग, श्रमदान, ढोल पथकाला मिळालेली बिदागी आणि दानशूरांची मदत याच्या सहाय्याने सुमारे ५२ फूट उंचीच्या आकर्षक व सुंदर मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. त्यासाठी सुमारे पंचेचाळीस लाख रुपये खर्च झाला. मंदिराच्या सभामंडपासाठी शासनाचा निधी मिळविण्यासाठी प्रस्ताव दाखल केला असून त्यासाठी मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. 

याबाबत उपसरपंच यशवंत तुर्डे व मंडळाचे कार्यकर्ते तुकाराम खोल्लम म्हणाले, ‘‘गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव आणि लग्न सोहळ्यात पारंपरिक वाद्यांना मागणी वाढली आहे. आठ ते दहा तासांसाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये बिदागी मिळते. वाहतूक आणि ढोलताशे दुरुस्तीचा खर्च वगळता शिल्लक राहिलेली रक्कम साठवून त्यातून गावाच्या गरजेची विकासकामे करण्यासाठी मंडळ मदत करते. त्याला सर्वांचा पाठिंबा मिळत आहे.’’

Web Title: marathi news vittal rakhumai temple hanuman tarun mandal