'छोट्या घटनांकडे दुर्लक्ष करू नका'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

पिंपरी - ‘‘आपल्यासोबत घडणाऱ्या छोट्या घटनांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते. वेळीच योग्य ती कार्यवाही करावी,’’ असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या ॲड. ज्योती सोरखडे यांनी विद्यार्थिनींना केले. 

पिंपरी - ‘‘आपल्यासोबत घडणाऱ्या छोट्या घटनांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते. वेळीच योग्य ती कार्यवाही करावी,’’ असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या ॲड. ज्योती सोरखडे यांनी विद्यार्थिनींना केले. 

महिला दिनानिमित्त यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन सकाळ) यांच्या वतीने पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालयात महिलांची सुरक्षितता आणि कायदे तसेच महिलांचे आरोग्य व काळजी या विषयावर गुरुवारी (ता. ८) व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी ॲड. ज्योती सोरखडे, डॉ. नीला महेसेकर, प्राचार्य डॉ. साहेन चितलंगे, प्रा. मारुती शेलार, डॉ. धीरज नागोरे, यिनचे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी उपस्थित होते. संयोजन यिनचे आरोग्यमंत्री आकाश टेकवडे यांनी केले. 

सोरखडे यांनी प्राचीन काळापासून महिलांना असलेले महत्त्व विशद केले. तसेच लग्न करताना काळजी न घेतल्यास महिलांची कशी फसवणूक होते, पुरुषांकडून त्यांना कसा त्रास दिला जातो, याबाबत शहरात घडलेल्या घटनांची उदाहरणासह माहिती दिली. कायद्याद्वारे महिलांना असलेले संरक्षण याबाबत कलम, व्याख्या आणि आरोपींना शिक्षा याबाबत सविस्तर सांगत सर्वधर्मीयांच्या विवाह कायद्याबाबतही माहिती सांगितली. महेसेकर यांनी आरोग्याबाबतची माहिती दिली. सकाळी लवकर उठण्याचे फायदे, मासिक पाळीच्या काळात कोणती काळजी घ्यायची, याबाबत माहिती दिली. टीव्हीवर मासिक पाळीच्या काळात तरुणींना उड्या मारताना पाहतो. त्याचे अनुकरण करू नका. आपल्या आजीने सांगितले आहे की, चार दिवस घराबाहेर पडायचे नाही. आजीने सांगण्याच्या मागे शास्त्रीय कारण आहे. सध्याच्या काळात हे शक्‍य नसले तरी जास्त दगदग करून घेऊ नका, हाच आजीचा सांगण्याचा यामागचा उद्देश आहे. आपल्यापैकी अनेकजण जेवण केल्यावर गोड पदार्थ खातात. मात्र गोड पदार्थ जेवणाच्या सुरवातीला खाल्ल्यास ॲसिडिटीचा त्रास कमी होत असल्याचे सांगत दिवसाचा आहार कसा असावा, कधी आणि किती व्यायाम करावा, याबाबतही मार्गदर्शन केले. गुजराथी यांनी जोपर्यंत पुरुष आणि महिलांमधील भेदभाव दूर होत नाही तोपर्यंत महिला दिनाची आवश्‍यकता असल्याचे सांगितले.

Web Title: marathi news YIN Jyoti Sorkhede student Do not ignore the small events