'आव्हाने पेलली, तरच यशाचा मार्ग सापडेल'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

पुणे - ‘‘आपल्याकडे कृषी, सेवा, वाहतूक, पॅकेजिंग, खाद्य-पर्यटन अशा विविध क्षेत्रांत नोकरीसह उद्योग-व्यवसायाला मोठ्या प्रमाणात संधी आहे. त्या दृष्टीने तरुणांनी ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’चा चांगला अभ्यास, अनुभव व योग्य मार्गदर्शन घेऊन या क्षेत्रात उतरावे. जिद्द, चिकाटी व कष्टाच्या जोरावर त्यातील आव्हाने पेलली, तरच यशाचा मार्ग सापडेल,’’ अशा शब्दांत ‘अभि ग्रुप ऑफ कंपनी’चे संचालक जितेंद्र जोशी यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र दिला.

सदाशिव पेठेतील निलया इन्स्टिट्यूट व यंग इन्स्पिरेटिव्ह नेटवर्क (यिन) यांच्यातर्फे ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’ या विषयावर जोशी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी ‘निलया’चे संचालक निलय मेहता, संचालिका पायल मेहता, स्मितेश शहा उपस्थित होते. तरुणांना भविष्यातील संधी दाखविण्याचे काम ‘सकाळ’च्या ‘यिन’मुळे शक्‍य झाले, असे जोशी यांनी नमूद केले. ते म्हणाले, ‘‘कोणताही उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाचा मुख्य प्रश्‍न असतो. त्यानंतर मनुष्यबळ, कच्चा माल, ब्रॅंडिंग, बाजारपेठ अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. विशेषतः मनुष्यबळ व ग्राहक यांची ‘मॅन मॅनेजमेंट’ करता आली पाहिजे. तेव्हाच उद्योग-व्यवसायाला गती प्राप्त होईल.’’

‘‘सेवा, कृषी, खाद्य-पर्यटन अशा क्षेत्रांत संधी असून, कमी भांडवलामध्येही चांगला व्यवसाय होऊ शकतो. नोकरीसाठी जेवढे कष्ट घेतले जातात, तेवढेच शेतीसाठी घेतल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होतो. राजकीय दृष्टिकोन सोडल्यास ‘जीएसटी’ व नोटाबंदीचा नागरिकांना फायदाच झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आली आहे,’’ असे जोशी यांनी सांगितले.‘‘दहावीला अपयशानंतर स्वतःच्या पायावर उभा राहिलो, त्यानंतर २४ वर्षांनी वर्गमित्रांना भेटलो. त्यांच्याबरोबर सामाजिक उपक्रम राबविल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना जोशी यांनी समर्पक  उत्तरे दिली. 

विविध क्षेत्रांतील नामवंतांना त्यांच्या क्षेत्रात आलेले अनुभव, अडचणी आणि त्यातून काढलेला यशस्वी मार्ग, नव्या पिढीसमोर मांडण्याचे काम ‘यिन’तर्फे अशा कार्यक्रमातून होत आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाबरोबरच प्रोत्साहनही मिळते. जिवंत उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर ठेवल्यामुळे त्यांना उद्योजकतेकडे वळण्यास प्रोत्साहन मिळते.
- निलय मेहता, संचालक ‘निलया’

Web Title: marathi news YIN pune student