बेदरकार तरुणाईला आवरा

बेदरकार तरुणाईला आवरा

भोसरी - मित्राच्या वाढदिवशी दुचाकीवर कर्णकर्कश आवाज करत रस्त्यावरून फिरणे... दुचाकी रस्त्यावर आडवी लावून रस्ता अडवून वाढदिवस साजरा करणे... छोट्याशा कारणावरून दुकानाची तोडफोड करणे... रस्त्यावरील वाहनचालकांशी अरेरावी करणे आदी प्रकार भोसरीत नित्याचेच झाले आहेत. मात्र या तरुणाईचा, एका अल्पवयीन मुलीला विनाकारण मारण्याचा प्रकार नुकताच घडला असल्याने या तरुणाईच्या बेदरकारपणाचा कळस झाला आहे. या बेदरकार तरुणाईवर वेळीच आळा घातला नाही, तर भविष्यात गंभीर स्वरूपाचे प्रकार होण्याची शक्‍यता आहे. अशा तरुणांवर वेळीच कारवाई झाली नाही, तर रस्त्याने मुली व महिलांचे जाणेही अवघड होणार आहे. त्यामुळे या तरुणाईला आवरण्याचे मोठे आवाहन भोसरी पोलिसांपुढे आहे.

प्रसंग १
स्थळ - गणराज हौसिंग सोसायटी, संत तुकारामनगर, भोसरी.
वेळ - सायंकाळी सव्वासात
तोंडात गुटख्याचा बुकणा भरलेला एक तरुण दुचाकीवरून मित्रासह येतो. गणराज हौसिंग सोसायटीकडे क्‍लासवरून घरी जाणाऱ्या मुलीचे केस पकडतो. मुलगी किंचाळते. तशीच पुढे जाते. मस्तवाल झालेला तरुण पळत जाऊन तिला मारहाण करतो व मित्रासह पसार होतो.

प्रसंग २
स्थळ - सिद्धेश्वर शाळा चौक, दिघी रस्ता, भोसरी.
वेळ - रात्री साडेआठ
कर्णकर्कश दुचाकीचा हॉर्न वाजवत पंधरा-वीस तरुण चौकात गोळा होतात. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रस्त्यावर दुचाकी लावतात व केक कापतात. रस्त्यावरील वाहनांमुळे वाहनचालकांना वाहने काढण्यास त्रास होतो. सुमारे अर्ध्या तासानंतर पुन्हा कर्णकर्कश हॉर्नचा आवाज करत तरुणाई पुढच्या चौकाकडे कूच करते.

प्रसंग ३
स्थळ - प्रियदर्शिनी हायस्कूल, दिघी रस्ता, भोसरी.
वेळ - दुपारी एक.
प्रियदर्शिनी शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा सेंड ऑफ डेच्या दिवशी त्या शाळेत नसलेली मुले दुचाकी घेऊन येतात. दुचाकीचा हॉर्न वाजवत बेदरकारपणे शाळेसमोरून वाहने पुढे घेऊन जातात. पुन्हा फिरून शाळेकडे येतात. शाळेचे मुख्याध्यापकांनी हातात दंडुके घेऊन पोलिस तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर पुन्हा कर्णकर्कश आवाज करत बेभान झालेले तरुण त्याच वेगाने दुचाकी घेऊन पुढे जातात.

प्रसंग ४
स्थळ - विरंगुळा केंद्र, इंद्रायणीनगर, भोसरी
वेळ - रात्री आठ
दारू पिलेल्या तरुणाद्वारे महिलेची छेडछाड. त्याचप्रमाणे रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना विनाकारण मारहाण. हा प्रकार नित्याचाच.

प्रसंग ५ 
स्थळ - गृहलक्ष्मी कॉलनी, सद्गुरुनगर, भोसरी
वेळ - सायंकाळी सहा
येथून रस्त्याने जाणाऱ्या महिला-तरुणींची मद्यधुंद झालेल्या तरुणाकडून छेडछाड. नित्याचाच प्रकार. येथील गणपती मंदिराजवळील पालिकेने बसविलेल्या बाकावर टवाळांचा अड्डा.

प्रसंग ६
स्थळ - इमारत क्रमांक ५९ व ६० मधील जागा, इंद्रायणीनगर, भोसरी 
वेळ - रात्री आठ ते पहाटे दोनपर्यंत
टवाळांची मद्यपान व गांजा ओढण्याची जागा. एकमेकांना मोठ्या आवाजात अर्वाच्च भाषा. सोसायटीतील नागरिक त्रस्त. नित्याचाच प्रकार.

घटनेत वाढ का?
 नागरिक टवाळांना घाबरून पोलिस ठाण्यात तक्रार करणे टाळतात. 
 टवाळखोरांच्या मनोधैर्यात वाढ.
 मुलांनी रस्त्यावरील वाढदिवस साजरा करण्याकडे पालकांचे दुर्लक्ष.
 टवाळांच्या वाढत्या संख्येमुळे परिसरात दहशत.
 पोलिसांचा कमी झालेला धाक.

परिणाम
मुली, महिला व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता.
मुली-महिला रस्त्याने जाताना असुरक्षित.

पोलिसांचे आवाहन
नागरिकांनी टवाळांना न घाबरता पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी.
परिसरात छेडछाडीचा प्रकार घडत असल्यास तातडीने १०० या क्रमांकावर कळवावे.

काय करावे ?
 छेडछाडीचा प्रकार होत असल्यास मुली-महिलांनी घरी तत्काळ सांगणे.
 पोलिसांना कळविणे.
 स्थानिक प्रतिनिधींना या गोष्टीची कल्पना देणे.
 टवाळांच्या अड्ड्यावरील सार्वजनिक बाक-खुर्च्या पालिकेने हटविणे.
 पोलिसांद्वारे परिसरात गस्त वाढविणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com