दरोडा प्रतिबंधक वाहनामुळे चोऱ्यांचे प्रमाण घटले

Marathi News_Vadgaon_Pune_the number of thieves decreased
Marathi News_Vadgaon_Pune_the number of thieves decreased

वडगाव निंबाळकर - पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या प्रमुख मार्गावर घडणाऱ्या गुन्ह्यांवर आळा बसावा व अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेल्या दरोडा प्रतिबंधक वाहनांचा आता चांगला परिणाम दिसू लागला आहे. गेल्या दोन महिन्यात गस्त असलेल्या मार्गावर कोठेही लुटमारीची घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पथकामुळे अपघातग्रस्तांना मदत मिळाली आहे.

जिल्ह्यातील प्रमुख मार्गावरील चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस अधिकक्षक सुवेझ हक व उपअधिकक्षक बरकत मुजारव यांच्या संकल्पनेतून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या प्रमुख मार्गावर दरोडा प्रतिबंधक वाहने तैनात केली आहेत. एकुण २३ राष्ट्रीय व राज्य मार्गावर वाहने रात्र-दिवस पहारा देत आहेत. यामध्ये जीपीएस यंत्रणा बसवली असून याचे नियंत्रण मुख्यालयातून केले जाते. यामध्ये मुख्यालयातील एक व स्थानिक पोलिस ठाण्यातील दोन असे तीन कर्मचारी सेवा बजावत असतात. गाडीत अत्याधुनिक संपर्क यंत्रणा, वायरलेस सेट, संरक्षण सामग्री असल्याने कोणतीही अघटीत घटना घडली की त्या ठिकाणी अल्पवधीत हे पथक पोहचते. तात्काळ घटना घडलेल्या मार्गालगत नाकाबंदी करण्यासाठी पथकातील यंत्रणेची मदत होते. संबधित वाहनाचे लोकेशन कळण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष मोबाईल अॅप दिले आहे. जिल्हा कंट्रोल रूममधून पोलिस उपनिरिक्षक गणेश शिंदे सर्व पथकांवर नियंत्रण ठेउन आहेत. गेल्या दोन महिन्यात याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे हद्दीतील नीरी सुपे मार्गावर गेल्या वर्षभरात दहापेक्षा अधिक वाटमारीच्या घटना घडल्या होत्या. याच मार्गावर एटीएम सेंटलरा कॅश पुरवणारी गाडीतील कॅश लुटली होती. या मार्गावर गस्त सुरू झाल्यापासून एकही चोरीची घटना घडली नाही.

जिल्ह्यातील विविध मार्गावर महिन्याला सुमारे पंचवीस तीस ठिकाणी चोरी वाटमारीचे गुन्हे नोंदवले जात होते. पण गस्त सुरू झाल्यापासून यावर चांगले नियंत्रण आले आहे, अशी माहिती उपनिरिक्षक शिंदे यांनी दिली. स्थानिक पोलिसांनाही पथकाची चांगली मदत होते. गेल्या महिन्यात रात्री दोनच्या सुमारास मोरगाव बारामती मार्गावर पुण्यातील जनावरांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर अवघ्या पंचवीस मिनिटात पथकाची मदत अपघातग्रस्तांना मिळाली होती. पोलीस ठाणे हद्दीतील गावातून दरोडे, जबरीचोरी यासारख्या गुन्ह्यावर नियंत्रण आल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन पाटील यांनी दिली.

जिल्हा कंट्रोल रूमच्या 100 नंबरवर येणाऱ्या कॉलची माहिती या पथकाला दिली जाते. तात्काळ पथक तेथे पोहोचत असल्याने मदत मिळू लागली आहे. नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी आहोरात्र गस्त घालणाऱ्या पथकाची चोरट्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. जिल्ह्यात तैनात असलेल्या दरोडा प्रतिबंधक वाहनांचे चांगले परिणाम दिसू लागल्याने अन्य मार्गावर संख्या वाढवता येईल का? याबाबत विचार केला जावा, अशी मागणी आता केली जाऊ लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com