"ट्विटर'वरही मराठी साहित्याचा जागर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

पुणे - साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर ठिकठिकाणच्या लेखकांना संधी मिळते; पण वाचकांना मिळते का? याचा विचार करताना, नाही हेच उत्तर समोर येते. ही गरज भरून काढण्यासाठी "ट्विटर'वर "मराठी भाषा संमेलन' होणार आहे. यात लेखकांबरोबरच सर्वसामान्य वाचकांनाही सहभागी होऊन मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीबाबत आपले मत व्यक्त करता येणार आहे. या व्यासपीठावर झालेली चर्चा पुढे पुस्तकरूपाने प्रकाशित होणार आहे. 

पुणे - साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर ठिकठिकाणच्या लेखकांना संधी मिळते; पण वाचकांना मिळते का? याचा विचार करताना, नाही हेच उत्तर समोर येते. ही गरज भरून काढण्यासाठी "ट्विटर'वर "मराठी भाषा संमेलन' होणार आहे. यात लेखकांबरोबरच सर्वसामान्य वाचकांनाही सहभागी होऊन मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीबाबत आपले मत व्यक्त करता येणार आहे. या व्यासपीठावर झालेली चर्चा पुढे पुस्तकरूपाने प्रकाशित होणार आहे. 

डोंबिवली येथे 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान साहित्य महामंडळाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. याच कालावधीत "ट्विटर'वरही संमेलन होणार आहे. या संमेलनाचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या संमेलनात "ट्विटर'वरून सहभागी झाले होते. त्यांनी संमेलनाचे कौतुकही केले होते. त्यांच्यासह अनेक राजकीय नेते, मराठी कलाकार, लेखक यांनीही या संमेलनाला उचलून घेतले. त्यामुळे यंदाही "नेटिझन्स'मध्ये या संमेलनाची उत्सुकता वाढत आहे. 

संमेलनाचे आयोजक स्वप्नील शिंगोटे म्हणाले, ""अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ केवळ लेखकांसाठी आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. मग वाचकांनी कुठल्या व्यासपीठावर व्यक्त व्हायचे? म्हणून हे व्यासपीठ आम्ही सुरू केले. मागील वर्षीच्या पहिल्या संमेलनात 8 हजारांहून अधिक वाचक सहभागी झाले होते; पण गेल्या वर्षभरात "ट्विटर' वापरण्याचे प्रमाण वाढल्याने यंदा संमेलनात सहभागी होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी अपेक्षा आहे. या व्यासपीठावर झालेली चर्चा विरून जाऊ नये, ती एकत्र पाहायला-वाचायला मिळावी म्हणून "ई-बुक'ही प्रकाशित करणार आहोत. त्यात या व्यासपीठावरील निवडक चर्चा, निवडक कविता-लेख घेतले जातील.'' 

बारा हॅशटॅग 
"ट्विटर'वरील साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी "माझीकविता', "माझीकथा', "माझाब्लॉग', "माझीबोली', "साहित्यसंमेलन', "वाचनीय', "हायटेकमराठी', "बोलतोमराठी', "मराठीशाळा', "भटकंती', "खमंग', "माझाछंद' हे बारा हॅशटॅग देण्यात आले आहेत. या विषयावर वाचकांना चर्चा करता येईल. 

मराठीतून ट्‌विट्‌स हे ध्येय 
ट्‌विटर हे एक जागतिक व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर रोज करोडो लोक आपले मत आपल्या भाषेत नोंदवतात. एकेकाळी फक्त इंग्रजी भाषेचा बोलबाला असणारे ट्‌विटर आज जगातील लिपी असणाऱ्या भाषांना सामावून घेत आहे. सध्या ट्‌विटरवर मराठी उगमावस्थेत असली, तरी त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. मराठीचे ट्‌विटरविश्व अधिकाधिक फुलावे आणि मराठीत रोज एक लक्ष ट्‌विट्‌स लिहिल्या जाव्यात, हे ध्येयही या संमेलनामागे आहे. 

Web Title: Marathi sahitya Jagar on Twitter