मराठी साहित्यावर पुलंचा ठसा

महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता - ‘पु. ल. नावाचे गारूड’  या विषयावरील परिसंवादात (डावीकडून) प्रवीण तरडे, आनंद भाटे,  डॉ. रामचंद्र देखणे, मंगला गोडबोले, रामदास फुटाणे आणि प्रा. मिलिंद जोशी.
महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता - ‘पु. ल. नावाचे गारूड’ या विषयावरील परिसंवादात (डावीकडून) प्रवीण तरडे, आनंद भाटे, डॉ. रामचंद्र देखणे, मंगला गोडबोले, रामदास फुटाणे आणि प्रा. मिलिंद जोशी.

पुणे - मराठी साहित्यात होणारे नवीन लेखन पुलंशिवाय अपूर्ण असून, त्यांचा ठसा आजही कायम आहे. कारण, त्यांच्या साहित्यात जिव्हाळा होता, असे मत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केले.

निमित्त होते पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘ग्लोबल पुलोत्सवा’च्या समारोप सोहळ्यानिमित्त ‘पु. ल. नावाचे गारूड’ या विषयावरील परिसंवादाचे. परिसंवादात मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, अभिनेते प्रवीण तरडे, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे आणि प्रसिद्ध गायक आनंद भाटे सहभागी झाले होते.

ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले यांनी पुलंवरील विविध किस्से, प्रसंग सांगत उपस्थितांना बोलते केले.

फुटाणे म्हणाले, ‘‘पुलंचा आशीर्वाद लाभल्याने माझी वाटचाल सुखकर झाली. त्यांनी ‘बलुतं’ या पुस्तकाविषयी रसग्रहणात्मक लेख लिहून मराठी वाचकांना दलित साहित्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन प्राप्त करून दिला.’’

डॉ. देखणे म्हणाले, ‘‘पुलंच्या साहित्यातून नेहमीच एक तत्त्वचिंतक डोकावत असतो. त्यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखांमध्ये त्यांचे तत्त्वचिंतन आपल्याला दिसते.’’

प्रा. जोशी म्हणाले, ‘‘भाषणदेखील आनंददायी होऊ शकते, हे पुलंचे भाषण ऐकल्यानंतर अनेकांना उमगले. विनोदी भाषणातूनदेखील आपण योग्य तो विचार श्रोत्यांपर्यंत पोहोचवू शकतो, हे पुलंनी सिद्ध करून दाखविले.’’

अभिनेते तरडे म्हणाले, ‘‘सर्वसामान्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी विनोद हा एकमेव मार्ग असू शकतो, हे पुलंनी आपल्या विविध कलाकृतींमधून दाखवून दिले.’’

भाटे म्हणाले, ‘‘संगीत क्षेत्रात जसे बालगंधर्व होते, तसे साहित्य क्षेत्रात पु. ल. होते. संगीत क्षेत्राशी बालगंधर्व आत्मीयतेने एकरूप झाले, तसेच पु. ल. साहित्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी जनांमध्ये एकरूप होऊन गेले होते.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com