साहित्य संमेलनात "पुस्तकांचे गाव' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

मुख्यमंत्री - पवार एकत्र 
डोंबिवली येथे 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान साहित्य संमेलन होणार असून, याचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून उद्‌घाटन समारंभासाठी निमंत्रित करण्यात आले आहे, तर समारोप सोहळ्याला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.

पुणे - राज्यात पुस्तकांचे गाव उभारले जाईल, अशी घोषणा करून दोन वर्षे उलटले तरी सरकारला अद्याप हे गाव उभारता आले नाही; पण या घोषणेची आठवण सरकारला यंदाच्या साहित्य संमेलनात होणार आहे. कारण, संमेलनस्थळी उभारले जात आहे "पुस्तकांचे गाव.' 

दोन वर्षांपूर्वी घुमान (पंजाब) येथे झालेल्या साहित्य संमेलनात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी पुस्तकांचे गाव उभारण्याची घोषणा केली होती. असे गाव देशातले पहिलेच गाव असेल. तेथे केवळ पुस्तके मिळतील, असे त्यांनी सांगितले होते; पण हे गाव उभारण्यात सरकारला अद्याप यश आलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर, संमेलनातील ग्रंथप्रदर्शनाला "ग्रंथग्राम' असे नाव देण्यात आले आहे. यातून सरकारला त्यांच्या घोषणेची आठवण करून देण्याचा प्रयत्न साहित्य महामंडळातर्फे केला जात आहे. 

"ग्रंथग्राम'मध्ये राज्यभरातील प्रकाशकांचे स्टॉल असतील. विविध विषयांवरील लाखो पुस्तके एकाच ठिकाणी येथे पाहायला मिळणार आहेत. या "ग्रंथग्राम'ला लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे यांचे नाव देण्यात आले आहे. "ग्रंथग्राम'चे उद्‌घाटन संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे. डॉ. ढेरे यांच्याबरोबरच समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांचे नाव संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला द्या, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेने केली होती. त्यामुळे मुख्य व्यासपीठाला प्रा. जाधव यांचे नाव देण्यात आले आहे. 

संमेलननगरीला पु. भा. भावे यांचे नाव देण्यात आले असून, सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, शं. ना. नवरे यांची नावे वेगवेगळ्या सभामंडपाला देण्यात आली आहेत, असे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री - पवार एकत्र 
डोंबिवली येथे 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान साहित्य संमेलन होणार असून, याचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून उद्‌घाटन समारंभासाठी निमंत्रित करण्यात आले आहे, तर समारोप सोहळ्याला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.

Web Title: marathi sahitya sammelan