मराठी शाळांकडे ओढा वाढतोय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

कामशेत - शाळा सुरू होऊन आठवडा झाला. विद्यार्थ्यांनी आपापल्या इच्छेप्रमाणे प्रवेश घेतला; परंतु अनेक पालाकांचा इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमाकडे कल असल्याचे आढळून आले. काही पालकांनी मुलांना मराठी माध्यमांच्या शाळेत दाखल केले आहे. 

कामशेत - शाळा सुरू होऊन आठवडा झाला. विद्यार्थ्यांनी आपापल्या इच्छेप्रमाणे प्रवेश घेतला; परंतु अनेक पालाकांचा इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमाकडे कल असल्याचे आढळून आले. काही पालकांनी मुलांना मराठी माध्यमांच्या शाळेत दाखल केले आहे. 

इंग्रजी शाळांमध्ये सोयीसुविधा भरपूर आहेत. चकाचक वर्ग, वाहतूक व्यवस्था; तसेच सीबीएसी बोर्ड, इंटरनॅशनल दर्जा, अशी वैशिष्ट्ये सांगितली जातात. मात्र, वस्तुस्थिती उलट आहे. अनेक शाळांत प्रशिक्षित शिक्षक नाहीत. काही ठिकाणी तर फक्त बारावी किंवा पदवीधर शिक्षक असतात. विशेषत: विनाअनुदानित शाळांत फक्त अस्खलित इंग्रजी बोलता येणे हीच पात्रता गृहीत धरली जाते. तसेच शुल्कही मोठे असते. 

शिक्षकांना अतिशय तुटपुंजे वेतन दिले जाते. सरकारी नियमांची अंमलबजावणी केली जात नाही. मुलांच्या मानसशास्त्रांचा अभ्यास अपवादात्मक परिस्थितीत विचारात घेतला जात आहे. घोकंपट्टी म्हणजेच अभ्यास व पूरक प्रकल्प म्हणजे प्रगती, असे चित्र अनेक शाळांत असते. शालाबाह्य उपक्रमासाठीदेखील वेगळे शुल्क आकारले जाते. प्रारंभी लहान वर्गात बालक असताना पालकांना अभ्यास घेणे सोयीचे असते; परंतु जशीजशी मोठ्या वर्गात मुले जातात तसा पालकांना अभ्यास घेणे अवघड होते. घरात वातावरण अभ्यासपूरक असतेच, असे नाही. अनेक पालकांनी या सर्व गोष्टींचा विचार करून पाल्यांना मराठी शाळेमध्ये दाखल केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीपासून इंग्रजी शिकविले जाते. तसेच या शाळांचा दर्जादेखील काही कमी नाही, असे अनेक पालकांच्या लक्षात आले आहे. मराठी माध्यमातील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात चमकत आहेत, तर परवडणाऱ्या खासगी शाळेत परवडणारे शुल्क व पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यामध्ये असलेला सुसंवाद यामुळे मराठी शाळांकडे कल वाढला आहे. अनेक मराठी शाळांत गेल्या आठ दिवसांत दुसरी ते आठवीपर्यंत माध्यम बदलून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. 

पंडित नेहरू विद्यालयाचे प्राचार्य नागेश माहुले यांनी सांगितले, की माध्यम बदलून अनेक विद्यार्थ्यांनी पाचवी ते आठवीपर्यंत प्रवेश घेतला आहे. 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किशोर तळेगावकर म्हणाले, यंदा पालकांचा मराठी माध्यमांकडे अधिक ओढा आहे. 

मावळच्या गटशिक्षणाधिकारी मंगल व्हावळ यांनी सांगितले, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाची  गुणवत्ता चांगली आहे. पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे. मातृभाषेतूनच शिक्षण दिले पाहिजे. 

मुलांना प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून देणे गरजेचे आहे. इतर माध्यमामुळे बालकांवर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे मुलांमध्ये नैराश्‍य येण्याची शक्‍यता असते. 
डॉ. शाळीग्राम भंडारी, लेखक 

Web Title: marathi school education