हे रंगकर्मींनो... हे मायबाप रसिकहो..!

नीला शर्मा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

मराठी रंगभूमी दिन आज (५ नोव्हेंबर) साजरा होत आहे. संगीत नाटकापासून सुरू झालेला प्रवास वास्तववादी, अतिवास्तववादी अशा वळणांनी पुढे सरकत आज नेमका कुठल्या टप्प्यावर आहे, याबद्दल प्रयोगशील नाट्यकर्मींचे हे विचार...

मराठी रंगभूमी दिन आज (५ नोव्हेंबर) साजरा होत आहे. संगीत नाटकापासून सुरू झालेला प्रवास वास्तववादी, अतिवास्तववादी अशा वळणांनी पुढे सरकत आज नेमका कुठल्या टप्प्यावर आहे, याबद्दल प्रयोगशील नाट्यकर्मींचे हे विचार...

नाटक ही एक चळवळ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुलचे विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांचा जागतिक परिप्रेक्ष्यात मराठी रंगभूमीबद्दल अभ्यास आहे. या केंद्रात विद्यार्थिदशेत व नंतर अध्यापन करताना त्यांच्या सहभागाने अनेक प्रकारच्या नाट्यकृती घडल्या. ते म्हणाले, ‘‘आमच्या केंद्रात शिकणारे किंवा शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी समांतर, व्यावसायिक, हौशी, स्पर्धा वगैरे विविध प्रकारच्या रंगभूमीसाठी काम करीत आहेत. नाटक ही एक चळवळ म्हणून त्यांनी स्वीकारली आहे. यांपैकी काही जण लहान-मोठ्या गावांमध्ये जाऊन नाटक सादर करतात. झाडाखाली, देवळात किंवा शाळेत पाचपन्नास प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी त्यांनी छोटी छोटी नाटके बसवली आहेत. काही कलावंत शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकातील धड्यांचे नाट्यीकरण करतात, तर काही रंगकर्मी एखाद्या स्वयंसेवी संस्थेचा संदेश नाट्यमय पद्धतीने सर्वसामान्यांपर्यंत नेतात. हे सारे फार आश्वासक आहे.’’

प्रायोगिकतेची आस 
‘चाफा’, ‘आई पण! बाबा पण!’, ‘गावकथा’ यांसारख्या प्रायोगिक नाटकांमधून स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारी अमृता पटवर्धन ही गुणी अभिनेत्री म्हणाली, ‘‘प्रायोगिक नाटकांमध्ये वेगळी आव्हाने घेऊन ती पेलण्यासाठी वाव असतो. यामुळे कलावंतांचा कस लागतो. चांगले काही हाती लागल्याचे समाधान मिळते. यातून त्यांना नवी ताकद गवसते. कलेच्या विश्वातली समृद्धी प्राप्त होते. यासाठी तर मालिकांमध्ये यशस्वी ठरलेल्या कित्येक कलावंतांनाही प्रायोगिक नाटकांमधून काम करायची आस लागलेली असते. हे सारे उज्ज्वल वर्तमान आणि आशादायक भविष्य दर्शविणारे आहे.’’

भरीव कामगिरीची गरज 
महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे पुण्यात प्रायोगिक रंगभूमीला खतपाणी मिळत राहिले आहे. सुदर्शन व ज्योत्स्ना भोळे यांनी रंगमंचावरून सादर केल्या जाणाऱ्या नाटकांनी आपला खास प्रेक्षकवर्ग घडविला आहे. या संस्थेसाठी दिग्दर्शक व अभिनेता म्हणून कार्यरत सचिन जोशी म्हणाले, ‘‘आजघडीला मोठ्या प्रमाणात प्रायोगिक नाटके येत आहेत. त्यातून नावीन्यपूर्ण विषय हाताळले जात आहेत. मांडणीतही निरनिराळे प्रयोग केले जात आहेत. मात्र, प्रयोगांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसते. पूर्वी एखाद्या प्रायोगिक नाटकाला निदान पंचवीस प्रयोगांपर्यंत मजल मारता येई, तर आत्ता जेमतेम दहा प्रयोगांतच ते थांबवावे लागते. हे का घडते, तेच कळत नाही. कदाचित, नाट्यकर्मी आपली कलाकृती तेवढ्या प्रभावीपणे पोहोचविण्यात कमी पडत असावेत. त्याचबरोबर लोकांनाही रंगमंदिरात जाऊन जिवंत सादरीकरण पाहण्यात आस्था राहिली नसावी. नाट्यकर्मी व रसिक, या दोन्ही घटकांनी याबाबत भरीव कामगिरी करण्याची गरज आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi theater day special