अबब.. चाकणला जुना कांदा दीडशे रुपये किलो  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

कांदा चिंगळीच्या आकाराचा असल्याने प्रतवारीनुसार या कांद्याला अगदी पन्नास रुपये किलोला घाऊक बाजारात भाव मिळत आहे. नवीन कांद्याला पन्नास ते नव्वद रुपये भाव मिळाला. तर जुन्या मोठ्या आकाराच्या कांद्याला प्रति किलोला सव्वाशे ते दिडशे रुपये भाव मिळाला. 
 

चाकण (पुणे) : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले बाजार आवारात नव्याने काढणी केलेल्या कांद्याला प्रतवारीनुसार पन्नास ते नव्वद रुपये किलोला भाव मिळाला. तर जुन्या मोठ्या कांद्याला सव्वाशे रुपये ते दीडशे रुपये किलोला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती बाळशेठ ठाकूर, बाजार समितीचे कर्मचारी गोविंद दौंडकर, व्यापारी गुलाब गोरे पाटील यांनी आज दिली. 

राज्यात कांद्याचे भाव दिवसागणिक वाढत आहेत. कांद्याची आवक बाजारात तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल झाली. यामध्ये नव्या, जुन्या कांद्याची आवक झाली. कांद्याला भाव वाढल्याने शेतकरी नवीन कांदा काढून विक्रीसाठी लगबगीने आणत आहेत. हा कांदा चिंगळीच्या आकाराचा असल्याने प्रतवारीनुसार या कांद्याला अगदी पन्नास रुपये किलोला घाऊक बाजारात भाव मिळत आहे. नवीन कांद्याला पन्नास ते नव्वद रुपये भाव मिळाला. तर जुन्या मोठ्या आकाराच्या कांद्याला प्रति किलोला सव्वाशे ते दिडशे रुपये भाव मिळाला. 
 
नवीन कांदा हा चिंगळी स्वरूपाचा बाजारात येत आहे. त्यामुळे त्याला भाव कमी आहे. जे शेतकरी नव्या कांद्याची काढणी करत आहेत, त्या नव्या कांद्याचे उत्पादन पावसाने मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे भाव वाढीव मिळूनही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वसूल होत नाही. शेतकऱ्यांनी बियाण्यासाठी ठेवलेला जुना कांदा शेतकरी सध्या विक्रीसाठी आणत आहे. या मोठ्या कांद्याला सव्वाशे रुपये ते दीडशे रुपये किलोला भाव मिळत आहे. जुन्या कांद्याची आवक अगदी कमी आहे. 
- गुलाब गोरे पाटील, व्यापारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the market of Chakan, onion is one hundred and fifty rupees k.g.