बाजार समितीत अतिक्रमणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मे 2019

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अतिक्रमणांनी पुन्हा जोर धरला आहे. पूर्वी लोखंडी पत्र्याचे स्टॉलचे अतिक्रमण होत होते. आता त्यापुढे एक पाऊल टाकत पक्के बांधकाम करून स्टॉल उभारण्यापर्यंत मजल गेली आहे. प्रशासनाच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्याची चर्चा बाजार आवारात सुरू आहे.

पुणे - पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अतिक्रमणांनी पुन्हा जोर धरला आहे. पूर्वी लोखंडी पत्र्याचे स्टॉलचे अतिक्रमण होत होते. आता त्यापुढे एक पाऊल टाकत पक्के बांधकाम करून स्टॉल उभारण्यापर्यंत मजल गेली आहे. प्रशासनाच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्याची चर्चा बाजार आवारात सुरू आहे.

बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस शेतमालाची आवक वाढत असून, माल उतरविण्यासाठी जागा कमी पडत आहे. यातच काही आडते आणि प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या अतिक्रमणांनी जागा बळकावल्या आहेत. प्रशासकीय संचालक मंडळ असताना काही संचालकांनी आर्थिक व्यवहारातून टपऱ्या टाकल्या होत्या. या टपऱ्यांच्या अतिक्रमणांकडे लक्ष वेधले गेल्यानंतर त्या काढण्यात आल्या. मात्र, पुन्हा त्यांचे प्रमाण वाढले आहे. 

समितीत प्रशासकीय राजवट असूनही आवारातील गणेश मंदिरालगत पक्के बांधकाम करून, कॅंटीनवजा हॉटेल थाटण्यात आले आहे. 

तसेच, एका ठिकाणी काँक्रीटचा चौथरा बांधून स्टॉल उभारण्यात आला आहे. कॅंटीनसाठी पाण्याचा जोडदेखील देण्यात आला आहे. गणेश मंदिरात दररोज ज्येष्ठ आडते, बाजार समितीचे अधिकारी, आडते असोसिएशनचे पदाधिकारी यांचा नियमित राबता असतो. तरीही याबाबत साधी तक्रारदेखील प्रशासनाकडे करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. गणेश मंदिराच्या भिंतीलगतच हे बांधकाम करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

विभागप्रमुख अनभिज्ञ 
समितीच्या आवारात झालेल्या पक्‍क्‍या बांधकामाबाबत अतिक्रमण विभागप्रमुखच अनभिज्ञ असून, या बांधकामाबाबत संबंधित अधिकारी विविध अडत्यांकडे विचारणा करीत असल्याची माहिती समोर येत आहे.

बाजार समितीमधील वाहतूक कोंडीमुळे आम्ही त्रस्त आहोत. वाहतुकीला अडथळा निर्माण होणारी पक्की अतिक्रमणे होत असतील तर हे चुकीचे आहे. आम्ही असोसिएशन म्हणून माहिती घेऊन, याबाबत प्रशासनाकडे तक्रार करू.
- विलास भुजबळ, अध्यक्ष, अडते असोसिएशन 

गणेश मंदिरालगत झालेल्या पक्‍क्‍या बांधकामाबाबत माहिती नाही. याबाबती माहिती घेऊन अतिक्रमण काढले जाईल.
- बी. जे. देशमुख, प्रशासक, पुणे बाजार समिती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Market Committee Encroachment Crime