बाजारपेठांतील गोदामे धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

वाहतूक कोंडीमुळे गैरसोय
लोकवस्तीत गोदामे असल्याने मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांची या भागात नेहमीच वर्दळ असते. पार्किंगची सोय नसल्याने खरेदीसाठी येणारे नागरिकदेखील त्यांची वाहने वाटेल तिथे उभी करीत आहेत. यामुळे या भागात वाहतूक कोंडी होऊन रहिवाशांची गैरसोय होत आहे.

पुणे - शहरात बाजारपेठांच्या परिसरातील मध्यवर्ती भागात फ्लॅट ताब्यात घेत व्यावसायिकांनी त्यातच गोदामे थाटली आहेत. इलेक्‍ट्रिक बाजारपेठ असलेल्या तपकीर गल्ली आणि आजूबाजूच्या बहुतांशी निवासी इमारतींत इलेक्‍ट्रिक वस्तूंची गोदामे असून ती विनापरवाना असल्याची नागरिकांची तक्रार आहे. परिणामी आगीच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची ही गोदामे रहिवाशांसाठी धोकादायक ठरत आहेत.

निवासी मिळकतींचा व्यावसायिक कारणांसाठी वापर दिवसेंदिवस वाढत आहे. या मिळकतींच्या वापरात बदल झाल्याची नोंद महापालिकेच्या मिळकत विभागाकडे केली जात नसल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. शिवाजी रस्त्यावरील कपड्याच्या दुकानापाठोपाठ तपकीर गल्लीतही आगीची नुकतीच घटना घडली. ही आग मध्यरात्री दोनच्या सुमारास लागल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती.

तपकीर गल्लीसह मंगळवार पेठ, बुधवार पेठ, रविवार पेठ, सोमवार पेठेचा काही भाग, नाना पेठ, भवानी पेठ परिसरात विविध वस्तूंच्या बाजारपेठा आहेत. सोने-चांदीचे दागिने, कपडे, इलेक्‍ट्रिक वस्तू, वाहने आदींसह विविध वस्तूंच्या बाजारपेठा या भागात आहेत. या बाजारपेठांमधील व्यावसायिकांनी दुकानाच्या जवळील निवासी इमारतींमध्ये गोदामांची व्यवस्था केली आहे.

तपकीर गल्लीत बहुतांशी इमारतींमध्ये इलेक्‍ट्रिक वस्तूंची गोदामे आहेत. त्यातच उन्हाळ्यामुळे आगीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ज्या इमारतींत गोदामे आहेत, तेथील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

निवासी इमारतींमध्ये गोदामे सुरू करताना व्यावसायिकांनी खबरदारीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. याकडे दुर्लक्ष होत असल्याने आग किंवा नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडल्यास जीवित हानी होण्याची धोका आहे.
- विजय झुरुंगे, रहिवासी, तपकीर गल्ली

Web Title: Market Godown Dangerous Fire Traffic