प्रशासक फक्त निर्णय घेतात, अंमलबजावणी शून्य; मार्केट यार्डातील संघटनांचा आंदोलनाचा इशारा

टीम ई सकाळ
Tuesday, 29 December 2020

समस्या सोडविण्यासाठी बाजार समिती प्रशासक आणि विविध संघटनांमध्ये बैठका होतात. त्यामध्ये उपाय सुचवून निर्णय घेतले जातात. तसेच प्रशासकांकडून यासंदर्भात अधिकाऱ्यांना आदेशही दिले जातात.

पुणे - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात रस्त्यांची झालेली दुरवस्था, सुरक्षा यासह विविध समस्या आहेत. समस्या सोडविण्यासाठी बाजार समिती प्रशासक आणि विविध संघटनांमध्ये बैठका होतात. त्यामध्ये उपाय सुचवून निर्णय घेतले जातात. तसेच प्रशासकांकडून यासंदर्भात अधिकाऱ्यांना आदेशही दिले जातात. मात्र त्यावर अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून, सुरक्षा रक्षकांकडून अंमलबजावणीच होतच नसल्याचा आरोप बाजारातील प्रमुख संघटनांनी केला आहे.

 मागील अनेक दिवसांपासून बाजार विस्कळीत होत चालला आहे. याचा व्यापारावर परिणाम होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ठरल्याप्रमाणे सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा आणि बाजार बंद ठेवयाचा इशारा बाजारातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन, दि पुना मर्चंट्‌स चेंबर, कामगार युनियान, यांच्यासह विविध संघटनांकडून देण्यात आला आहे. याबाबत या संघटनानी प्रशासकांना निवेदन दिले आहे.

बाजार आवारात चोऱ्या, दमदाटीचे प्रकार वाढले आहे. याबाबत वेळोवेळी तक्रारही करण्यात आली होती. दररोज पहाटे किरकोळ खरेदीदार टेम्पो घेऊन बाजार आवारात येतात. प्रवेशद्वार क्रमांक एकमधून पहाटे तीन ते पाच यावेळेत शंभर टेम्पो सोडावेत, असे बैठकीत ठरले होते. मात्र, बाजार समितीचे कर्मचारी, सुरक्षारक्षक टेम्पोला प्रवेश देत नाही. त्यामुळे टेम्पोची रांग लागते. बाजार आवार मोकळा असतो. मात्र, टेम्पो आत सोडले जात नाही. भाजीपाला नाशवंत आहे. त्यामुळे विक्रीवर परिणाम होत असल्याचे आडते असोसिएशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याबाबत बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांना मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता फोनद्वारे संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

बाजारातील समस्यांबाबत वेळोवेळी चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रशासकांबरोबरच ठरलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. बाजार समितीचे कर्मचारी आणि सुरक्षारक्षक सहकार्य करत नाहीत. सुरक्षारक्षकांचा तुटवडा असून, यंत्रणा विस्कळीत आहे. व्यापाराची परिस्थिती कठीण बनली आहे. या गोष्टीला वेळी आवर घातला पाहिजे. अन्यथा येथील व्यापाराचे भव्यतव्य कठीण दिसते आहे.
- विलास भुजबळ, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन.

प्रशासकांसोबत बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणीच होतच नाही. प्रशासकांना हलक्‍यात घेतले जात आहे का, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. प्रशासकांनी प्रशासकीय कौशल्य दाखवावे. बाजारातील सर्व समस्या सोडवाव्यात.
- संतोष नांगरे, सचिव, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन

दि पुना मर्चंट्‌स चेंबरचा आंदोलनाचा इशारा
बाजार समिती प्रशासन आणि चेंबरच्या पदाधिकाऱ्यांमध्ये 2 डिसेंबर रोजी बैठक झाली होती. त्यामध्ये रस्ते दुरूस्ती, खड्डे बुजविणे आणि सभासदांच्या दुकानाबाहेरील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्याच्या विषयावर चर्चा झाली. ही सर्व कामे आठ दिवसात पूर्ण करण्याचे आश्‍वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, अद्याप ही कामे झालेली नाहीत. 31 डिसेंबरपर्यंत रस्त्याची कामे सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चेंबरने प्रशासकांना पत्रकाच्या माध्यमातून दिला आहे.

याबाबत चेंबरचे सचिव विजय मुथा यांनी माहिती दिली. दरम्यान व्यापारी लाखो रुपयांचा सेस भरतात. मात्र, व्यापाऱ्यांना किमान पायाभुत सुविधा मिळत नाहीत. रस्ते खराब बनले आहेत. याबाबत दि पुना मर्चंट्‌स चेंबरने पत्र दिले आहे. मात्र, त्यावर कोणतही निर्णय झालेला नाही. या पार्श्‍वभूमीवर एक दिवसाचा बंद ठेवून, बाजार समिती प्रशासनाचे लक्ष वेधावे, अशा मागणीचे पत्र चेंबरचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक प्रवीण चोरबेले यांनी चेंबरला दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: market yard few unions warn committee no action on decision