बाजारांचे स्थलांतर कागदावरच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पुणे - सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी नाना, भवानी पेठेतील किराणा भुसार मालाचा बाजार गुलटेकडी येथे स्थलांतरित झाला; पण त्यानंतर टिंबर, लोखंड आदी बाजाराचे स्थलांतर न झाल्याने वाहतूक कोंडीतच मध्य पुणे अडकून पडले आहे. वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास होणाऱ्या उल्लंघनाने त्यात भर पडत आहे. 

नाना पेठ, भवानी पेठ, गणेश पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ या मध्यभागातील पेठांचा परिसर म्हणजे बाजारपेठांचा भाग आहे. रविवार पेठेतील कापड बाजार, हार्डवेअरची दुकाने, गुरुवार आणि रविवार पेठेतील स्टेनलेस स्टील आणि भांड्यांचा व्यापार, भवानी पेठेतील टिंबर आणि लोखंड बाजार, शुक्रवार आणि गणेश पेठेत असलेले विविध प्रकारची दुकाने, नाना पेठेतील वाहनांचे सुटे भाग विक्रीचा परिसर, अलीकडील काही वर्षांत जुन्या दुचाकींचा निर्माण झालेला रास्ता पेठेतील बाजार यामुळे या भागांत वाहतूक कोंडी हा महत्त्वाचा प्रश्‍न बनला आहे. 

बिबवेवाडी येथे लोखंड आणि टिंबरबाजार स्थलांतरित केला जाणार होता; परंतु त्यामध्ये यश आले नाही. शहराच्या मध्यवस्तीत जड वाहतूक करण्यास वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे माल उतरविण्याचे काम हे रात्री किंवा पहाटेच करावे लागते. 

वाहतूक कोंडीमुळे जास्त माल मागविता येत नाही, ग्राहकदेखील खरेदीला येणे कमी झाले आहेत. त्यामुळे रिंगरोडलगत टिंबर मार्केटसाठी जागा मिळाली, तर व्यवसाय वाढण्यास मदत होईल. 
- रतन किराड, दि पूना टिंबर मर्चंट्‌स सॉ मिल्स असोसिएशन.

बाजाराचा भाग असलेल्या अनेक रस्त्यांवर एकेरी वाहतूक आहे. त्याकडे वाहनचालक सर्रास दुर्लक्ष करतात.   वाहतूक पोलिस नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सोडून व्यापाऱ्यांनाच त्रास देतात. 
- कैलास पांड्या, स्टेनलेस स्टील मर्चंट्‌स असोसिएशन. 

Web Title: Markets Shifting on paper