इच्छेविरुद्ध लग्नाच्या भीतीने पळालेल्या तरुणीला शोधले 

इच्छेविरुद्ध लग्नाच्या भीतीने पळालेल्या तरुणीला शोधले 

पुणे - आई-वडील नसल्यामुळे मावशी-काकांकडे वाढलेल्या सविताचे (नाव बदललेले आहे) लग्न नात्यातील एका मुलाशी ठरविले होते. मात्र ते मान्य नसल्याने ती घरातून पळून गेली. याबाबत पालकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून तिचा शोध घेतला. तिचे म्हणणे ऐकल्यावर पोलिसांनी पालकांना समजावून सांगितले. त्यानंतर त्यांनी तिच्या मर्जीनुसार लग्न लावून द्यायची तयारी दर्शविली. 

एखाद्या चित्रपटाला शोभणारा हा प्रकार मंगळवार पेठेतील सविता समवेत घडला. तिला आई-वडील नसल्याने मावशी-काकांनी तिचा मुलीप्रमाणे सांभाळ केला. सविता 19 वर्षांची झाल्याने तिचे लग्न करून देण्यासाठी मावशी-काकांनी लग्नासाठी स्थळे पाहण्यास सुरवात केली. त्या वेळी नात्यातील मुंबईच्या एका मुलासमवेत तिचे लग्न ठरविले. मात्र सविताने त्या मुलासमवेत लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर तिला लग्नासाठी जबरदस्ती करण्यात येऊ लागली. यामुळे कंटाळलेल्या सविताने अखेर घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला व नऊ मे रोजी ती घरातून पळून गेली. 

मावशी-काकांनी तिचा भरपूर शोध घेतला. मात्र ती आढळून आली नाही. यामुळे त्यांनी फरासखाना पोलिस ठाणे गाठून पोलिसांना घडलेली हकिकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. तिच्याकडील मोबाईलच्या लोकेशनवरून ती स्वारगेट, पर्वती दर्शन परिसरात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला पोलिस ठाण्यात आणले. तिच्या मावशी-काकांना देखील त्या ठिकाणी बोलविले. पोलिस निरीक्षक किशोर नावंदे, सहायक पोलिस निरीक्षक अमित घुले, पोलिस कर्मचारी सविता मिडगुले, बजरंग बिचकुले, प्रवीण गोरे यांनी सविताची समजूत काढली. तसेच मावशी व काकांना तिच्या इच्छेविरुद्ध लग्न न करण्याबाबत सांगितले. त्यानंतर त्यांनीही आपली चूक मान्य करत सविताच्या मनानुसार लग्न लावून देण्याची तयारी दर्शविली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com