पुणे : 'ह्या कचराडेपोमुळं माझ्या पोटच्या पोराचं लग्न जमंना'

Marrige-2.jpeg
Marrige-2.jpeg

पुणे : तुला म्हणून सांगते लेका, ह्या कचराडेपोमुळं माह्या पोटच्या पोराचं लग्न जमंना ही काय सांगण्याची गोष्ट हाय व्हय तवा? आमी लोकांना सांगतो, पोरगा अजून लग्न कराय नाय म्हणतोय. पण, खरं कारण आमची आमाला माहिती. उगी बदनामी नको म्हणून गप बसतोय.

पन्नाशी ओलांडलेल्या सगुणाबाई (नाव बदललेले आहे) तोंडावर पदर ठेवत दबक्‍या आवाजात आपली कैफियत सांगत होत्या. स्थानिक राजकारणी आणि प्रशासनाच्या अडेलतट्टु धोरणामुळे कचराडेपोचा प्रश्‍न मार्गी लागेना आणि हा प्रश्‍न मार्गी लागत नाही म्हणून त्यांच्या पोराचा संसार काही सुरू होईना. 

फुरसुंगीत राहणाऱ्या सगुणाबाई कचराडेपोपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर राहतात. दोन खोल्यांच त्यांच स्वत:चं राहतं घर. पत्र्याच्या दहा बाय बाराच्या शेडमध्ये नवरा वेल्डींगच काम करतो. मुलगा एमए झालाय आणि आता एका पतसंस्थेत नोकरीला आहे. त्याचा पगार चौदा हजार. मुलीचं लग्नही झालं; पण मुलाच्या लग्नाची 
वेळ आली आणि कचराडेपोच्या प्रश्‍नाने तोंड वर काढलं. 

मागच्या टायमाला नायका पुण्याचा कचरा अडवला होता हितल्या लोकांनी. तवा पान पान भरुन बातम्या येत होत्या पेपरमधी. नेमकी तवाच सोलापूरची सोयरीक जुळत आली होती. पोरीकडच्यांना पोराचा फोटोबी पसंद पडला होता. पण ते पोरगा पहायला घरी आले नेमके तवाच कचऱ्याचं आंदोलन चालू होतं.

आमच्या  घराच्या ओसरीतूनच ते दिसत होतं. कचऱ्याचा वास तर नेहमीच घरामध्ये येतो. ती सारं पाहून सोयरे म्हणाले, आमची हितं पोरगी दिल्याव ती तर ह्या वासानी गुदमरुनच मरायची. आता ते असं म्हणल्यावर आमी गपच बसलो. पोरगा दुसरीकडं रहायला गेला तर सांगा, मग आपण पुढची बोलणी करू, असं म्हणून ती लोकं गेली ती परत आलीच नाय. दोन महिन्यांनी त्यांच्याच पोरीच्या लग्नाची पत्रिका आमच्या घरी आली. 

त्यानंतरबी दोनचार पाहुणे येऊन पोराला पाहून गेले पण कचरा डेपो जवळ असल्याचं पाहून नकार कळवत्यात. आता आम्ही राहतं घरं सोडून कसंकाय कुठं जाणार ? पोरगा आधी म्हणत होता मी नाय जाणार घर सोडून. पण, आता त्याच्यापुढबी दुसरा काय पर्याय नाय. लग्न करायचं म्हणल्याव त्याला घर सोडावाच लागणारे. बघु जमलं तर घरदार विकून जाऊ कुठतरी लांब रहायला आमी समदेच. असं म्हणत ती माऊली शांत झाली. एकुलत्या एक, शिकलेल्या, नोकरीवाल्या आणि स्वत:चं घर असलेल्या पोराच्या लग्नाला कचराडेपोचा अडथळा होईल, असं तिला कधी स्वप्नातही वाटलं नसेल. पण, ते झालं. अर्थात, हा प्रश्‍न एकट्या सगुणाबाईच्या मुलाचा नाही, फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या हजारो तरुणांचा आहे. कचराडेपोचा प्रश्‍न सुटेल तेव्हाच इथल्या मुलांच्या लग्नाचा प्रश्‍नही सुटेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com