अतिदक्षता विभागात विवाह अन्‌ सर्वांचे पाणावले डोळे...

सुनील कडूसकर
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

पुणे - आयसीयू’मध्ये विवाह सोहळा कधी साजरा होऊ शकेल, याची खुद्द त्या रुग्णालयालादेखील कल्पना नव्हती. मुळात असा विवाह करायला परवानगी देणे हाच एक धाडसी निर्णय होता; पण अत्यंत गुंतागुंतीच्या आणि भावनिक पेचामुळे अखेर त्या रुग्णालयाला सोहळ्याला परवानगी देणे भाग पडले आणि ज्यांच्यासाठी हा विवाह सोहळा ‘आयसीयू’मध्ये साजरा करण्यात आला. त्यांची ‘प्राणज्योत’ लग्नानंतर काही तासांमध्येच मालवली. त्यामुळे सर्वांचे डोळे पाणावले.  

पुणे - आयसीयू’मध्ये विवाह सोहळा कधी साजरा होऊ शकेल, याची खुद्द त्या रुग्णालयालादेखील कल्पना नव्हती. मुळात असा विवाह करायला परवानगी देणे हाच एक धाडसी निर्णय होता; पण अत्यंत गुंतागुंतीच्या आणि भावनिक पेचामुळे अखेर त्या रुग्णालयाला सोहळ्याला परवानगी देणे भाग पडले आणि ज्यांच्यासाठी हा विवाह सोहळा ‘आयसीयू’मध्ये साजरा करण्यात आला. त्यांची ‘प्राणज्योत’ लग्नानंतर काही तासांमध्येच मालवली. त्यामुळे सर्वांचे डोळे पाणावले.  

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) शनिवारी (ता. १७) सकाळी ११ च्या सुमारास हा विवाह झाला. वस्तुतः हे लग्न साताऱ्याच्या दत्तनगर परिसरातील मोरया लॉन्स मंगल कार्यालयात रविवारी (ता. १८) दुपारी सव्वाबारा वाजता होणार होता. वधू आणि वर हे दोघेही पुण्यातील असले, तरी पुण्यात कार्यालय उपलब्ध नसल्याने त्यांनी हा सोहळा साताऱ्यात करण्याचा निर्णय घेतला होता. एमबीए झालेल्या ज्ञानेश नंदकुमार देव यांनी वधू म्हणून एमबीए झालेल्याच सुवर्णा मानसिंह काळंगे यांची निवड केली होती. एकीकडे वधू-वर पक्षाकडून लग्नाची जोरदार तयारी सुरू असतानाच दुसरीकडे ज्ञानेश यांचे वडील नंदकुमार हे हृदयविकाराशीही झुंजत होते. टाटा मोटर्समधून निवृत्त झाल्यानंतर मुलाचे लग्न डोळ्यांदेखत व्हावे, अशी त्यांची इच्छा होती; पण प्रकृती साथ देत नव्हती म्हणून त्यांना आठ-दहा दिवसांपूर्वी मंगेशकर रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर अँजिओप्लॅस्टिची शस्त्रक्रियाही केली होती.

शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सुधारल्याने घरचेही काहीसे चिंतामुक्त होते.   
आपण रुग्णालयात असलो, तरी नियोजित तारखेलाच विवाह व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. या परिस्थितीमध्ये हा विवाह करणे योग्य ठरणार नाही, असे वधूच्या नातेवाइकांनी ठरविले आणि हे कार्य लांबणीवर टाकत असल्याचे वराकडील मंडळींना कळविले.

मात्र, तरीही वडिलांच्या डोळ्यांदेखतच हा सोहळा व्हायला हवा, अशी वराकडील कुटुंबीयांची इच्छा होती. त्यामुळेच दोन्ही कुटुंबीयांनी रुग्णालयाकडे हा लग्नविधी करायला परवानगी मागितली. वधूचे मामा नेत्रतज्ज्ञ डॉ. राजेश पवार यांनीही देव यांच्यावर उपचार करणारे हृदरोगतज्ज्ञ डॉ. सतेज जानोरकर यांच्याशी चर्चा करून ही परवानगी द्यावी, अशी विनंती केली. रुग्णालयानेही हा विवाह करण्याची परवानगी देण्याचा धाडसी निर्णय घेतला. नियोजित कार्यक्रमानुसार हा विवाह रविवारी १८ डिसेंबरला दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी निश्‍चित केला होता. परंतु, नंदकुमार देव यांची ढासळती प्रकृती पाहता डॉक्‍टरांनी हे कार्य लवकर करावे असे सुचविले. त्यानुसार एक दिवस आधीच वधू-वरांनी परस्परांना वरमाला घातल्या. त्यानंतर वधू-वरांनी रुग्णशय्येवर असलेल्या वडिलांना व उपस्थित ज्येष्ठांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर काही तासांतच देव यांची प्राणज्योत मालवली.

...अन्‌ लग्नानंतर प्राणज्योत मालवली 
‘आयसीयू’मध्ये लग्न झाल्यानंतर रुग्णशय्येवर असलेल्या 
नंदकुमार देव यांच्या चेहऱ्यावर हा सोहळा डोळ्यांदेखत झाल्याचे समाधान दिसत होते. नियतीचा योगायोग या वास्तवात इतका विचित्र होता, की त्यांची प्राणज्योत लग्नानंतर काही तासांतच मालवली. जणू काही त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीनेच त्यांनी त्यांच्या मृत्यूला काही तास रोखून धरले असावे, अशी भावना वधुपित्याची झाली होती.

Web Title: marriage in icu