हवेलीत तरुणांकडून विवाहाची आचारसंहिता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

लोणी काळभोर - विवाह सोहळ्यांना नेत्यांच्या उपस्थितीसाठी ताटकळणारे वधू-वर आणि त्यांचे सगेसोयरे; तसेच नेत्यांच्या मोटारींच्या ताफ्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी याला लोक कंटाळायला लागले आहेत. लग्न सोहळ्यांमध्ये होणाऱ्या अशा दिरंगाईला आळा घालण्यासाठी पूर्व हवेलीतील तरुणांनी एकत्र येऊन आदर्श आचारसंहिता तयार करण्याची सुरवात केली आहे. 

लोणी काळभोर - विवाह सोहळ्यांना नेत्यांच्या उपस्थितीसाठी ताटकळणारे वधू-वर आणि त्यांचे सगेसोयरे; तसेच नेत्यांच्या मोटारींच्या ताफ्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी याला लोक कंटाळायला लागले आहेत. लग्न सोहळ्यांमध्ये होणाऱ्या अशा दिरंगाईला आळा घालण्यासाठी पूर्व हवेलीतील तरुणांनी एकत्र येऊन आदर्श आचारसंहिता तयार करण्याची सुरवात केली आहे. 

याचाच एक भाग म्हणून कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील तरुणांनी रविवारी एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रास आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष माधव काळभोर, सुभाष काळभोर, विलास काळभोर, मंगलदास बांदल, अनिल टिळेकर, युगंधर काळभोर यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी, महिला कार्यकर्त्या, तंटामुक्ती समित्या, सामाजिक संस्था व लग्न समारंभाशी संबंधित व्यक्ती उपस्थित होते. 

पूर्व हवेली विचार मंचाच्या वतीने कमलेश काळभोर, राकेश काळभोर, शिवदीप उंद्रे, रामदास हरगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या चर्चासत्राचे आयोजन केले होते.

लग्न समारंभासाठी येणाऱ्या नेतेमंडळींच्या भाषणांमुळे समारंभात होणारी दिरंगाई व त्यामुळे आलेल्या पाहुण्यांच्या वेळेचा अपव्यय, महामार्गावर पार्किंग होणाऱ्या दुचाकी व चारचाकी गाड्यांच्या पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी, अशा विविध विषयांवर या वेळी चर्चा करण्यात आली. 

लग्नसोहळ्यामध्ये होणारी दिरंगाई टाळण्यासाठी सोहळ्यामध्ये येताना राजकारण्यांनी वेळेचे बंधन व आलेल्या पाहुण्यांच्या मानसिकतेचा विचार करणे गरजेचे असल्याचे मत आमदार बाबूराव पाचर्णे यांनी व्यक्त केले.  

सध्या लग्नकार्यात पुढाऱ्यांच्या भाषणांमुळे सोहळ्यात होणारी दिरंगाई कमी करण्यासाठी पुढाऱ्यांनी स्वतः बदलण्याची गरज आहे; तसेच सामुदायिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य देणे गरजेचे बनले आहे. येत्या दिवाळीमध्ये भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन करणार आहे. 
- प्रदीप कंद, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे

आचारसंहितेतील मुद्दे
    साखरपुडा घरीच करावा किंवा साखरपुड्यात लग्न केल्यास उत्तम
    लग्नपत्रिका छापताना पुढाऱ्यांच्या नावापेक्षा घरातील मंडळींची नावे असावीत किंवा पत्रिका न छापता लग्नाच्या आमंत्रणासाठी सोशल मीडियाचाच वापर करावा.
    कुटुंबातील प्रमुखांनी प्रवेशद्वारावर पाहुण्याचे स्वागत करावे.
    पुरोहितांनी वेळेत लग्नसोहळा उरकण्यासाठी प्रयत्न करावेत.
    नेतेमंडळींचा सत्कार, आशीर्वाद व वैयक्तिक स्वागत टाळून वेळ वाया जाणार नाही याकडे लक्ष द्यावे.
    आपल्या वाहनांमुळे इतरांना किवा रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी होणार नाही याकडे लक्ष द्यावे.

Web Title: marriage issue youth