#MarriageIssues जुळणाऱ्या रेशीमगाठींना टेस्टची होतेय बाधा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

...आणि त्यांचे बिनसले
सेट-नेट झालेल्या मुलीला सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या राहुलचे स्थळ आले होते. लग्नाचा विषय आईवडिलांसमोर मांडण्यापूर्वी ते दोघे भेटले. त्या भेटीत त्यांनी एकमेकांना समाजावून घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी दोघांनीही पुढील भेटीवेळी आपली तपासणी करून रिपोर्ट आणण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे पूजा तिचे रिपोर्ट घेऊन आली; पण राहुलला ती बाब न पटल्याने त्याने रिपोर्ट आणलेच नाहीत. त्यावरून त्यांच्यात मतभेद झाले आणि पूजा खूपच ‘ॲडव्हान्स’ आहे, त्यामुळे मला तिच्याशी लग्न करायचे नाही, असे राहुलने त्याच्या घरी सांगितले.

पुणे - लग्न कसे करून देणार, तारीख आणि ठिकाण कोणते असणार, लग्न कशा पद्धतीने करायचे, यांसह पत्रिका आदी बाबींपर्यंत मर्यादित असलेल्या ‘शुभमंगल’च्या चर्चेत आता मुला-मुलीच्या आरोग्य तपासणीचादेखील मुद्दा येत आहे. मात्र, अजूनही त्याबाबत मानसिकता नसल्याने जुळणाऱ्या रेशीमगाठींसाठी टेस्टची मागणी बाधा ठरत आहे. अशाप्रकारे अनेक लग्ने मोडली असल्याची उदाहरणे आहेत.

कपडे, जेवण, पत्रिका, डेकोरेशन आदी बाबींवर एकमत असलेल्या दोन्ही कुटुंबीयांचे लग्नापूर्वीच्या तपासणीवरून मात्र ‘वाजत’ असल्याचे अनेक स्थळांबाबत घडत आहे. मुलीच्या गरोदरपणाबाबत येणाऱ्या अडचणी आणि मुलाला कोणता दुर्धर आजार तर नाही ना, या दोन प्रमुख बाबी तपासणे हा टेस्टमागील मुख्य उद्देश असतो. त्याचबरोबर दोघांनाही एचआयव्ही नाही ना, शरीरावर पांढरे चट्टे, मानसिक संतुलन, शरीरसंबंध ठेवण्यास समर्थ आहे का, यापूर्वी कोणते ऑपरेशन झाले आहे का, याची खातरजमा करण्यासाठी तपासणी करण्याचा आग्रह असतो. मात्र, याला नकार दिला जात आहे. तपासणीची मागणी होतेय; म्हणजे मुलगा किंवा मुलगी खूपच ‘ॲडव्हान्स’ आहे, अशीही समजूत करून घेतली जात आहे.

विशेषतः मुलगी आणि तिच्या घरच्यांकडून आरोग्याच्या टेस्टच्या मागणीचे प्रमाण जास्त आहे. मात्र, दोन्ही कुटुंबे ओळखीतील असतील किंवा मध्यस्थ नात्यातील असतानादेखील अशी मागणी झाल्यास मुलीच्या कुटुंबीयांकडे तिरक्‍या नजरेने पाहिले जाते. ‘आम्ही तुम्हाला एवढं चांगलं स्थळ दाखवलं; पण तुमचा आमच्यावर भरवसा नाही,’ असे म्हणून मध्यस्थी फारकत घेतो.

Web Title: Marriage Issues Relation Health Test