शुभमंगल सावधान!.. ना बाजा, ना गाजावाजा

Marriage
Marriage

टाकवे बुद्रुक, वडगाव मावळ - मावळ तालुक्‍यात लग्न समारंभातील अनिष्ट प्रथा व बडेजाव रोखण्यासाठी कीर्तनकार व प्रवचनकारांनी अनेकदा प्रयत्न करूनही त्यात त्यांना यश आले नव्हते. मात्र, यंदाच्या लग्नसराईत कोरोनामुळे ही गोष्ट सहज साध्य झाली आहे. अनेक पूर्वनियोजित विवाह घरगुती व अगदी साध्या पद्धतीने पार पडत आहेत. ग्रामीण भागात शेतातून मंगल कार्यालयात गेलेले विवाह पुन्हा शेतात व मंदिरात होऊ लागले आहेत. कान्हे येथील मंदिरात रविवारी (ता. १८) असाच एक विवाह सोहळा झाला. कोणताही बडेजाव नाही व थाटमाट नाही. खर्चाची उधळपट्टी नाही व सत्कार समारंभही नाहीत, अशा पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या विवाह सोहळ्यांमुळे सर्वसामान्य कुटुंबे सुखावली आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पूर्वी आठ-आठ दिवस चालणारे लग्नविधी नंतर एक-दोन दिवसांवर आले. परंतु त्यात अनिष्ट प्रथांचा शिरकाव झाला. जमीन खरेदी-विक्रीचे व्यवसाय तेजीत आल्यापासून या प्रथांना बळ मिळाले. लग्नपत्रिकांतील नावांची मांदियाळी, बडेजाव थाटातील कुंकुमतिलक समारंभ, हटके हळदी समारंभ, लाखो रुपये खर्चाचे डेकोरेशन, मिरवणूक, पंचपक्वान्नाच्या जेवणावळी, वरात आदी बाबींवर होणारा खर्च, डिजेच्या दणदणाटामुळे होणारे ध्वनिप्रदूषण, राजेशाही थाटातील मिरवणुकांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी, लांबलेली मिरवणूक यामुळे लग्नसोहळे चर्चेचा विषय बनले. नाइलाजास्तव सर्वसामान्य कुटुंबांनाही त्यांचे अनुकरण करावे लागले. आर्थिक स्थिती नाजूक असलेल्यांची फरफट होऊ लागली. काहींनी जमिनी विकून तर काहींनी कर्जबाजारी होऊन असे लग्न पार पाडल्याचीही उदाहरणे आहेत. 

मध्यंतरी तालुक्‍यातील काही कीर्तनकार व प्रवचनकारांनी समन्वय समितीच्या माध्यमातून या अनिष्ट प्रथांविरोधात चळवळ उभारली होती. बडेजाव तसेच अनावश्‍यक व चुकीच्या प्रथा बंद करण्याचा ठराव त्यांनी केला. परंतु प्रस्थापित घराण्यांनी पुढाकार न घेतल्याने सर्व ठराव कागदावर राहिले. अखेर कीर्तनकार व प्रवचनकारांनीही हात टेकले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com