कोंदट वातावरणात सहजीवनाचा श्रीगणेशा

शिवानी खोरगडे
रविवार, 27 मे 2018

विवाह नोंदणी कार्यालय म्हणजे असुविधांचे आगार अन्‌ एजंटांचा विळखा असे चित्र आहे. त्यामुळे सहजीवनाची सुरवात करणाऱ्या नवदांपत्यांचा हिरमोड होऊन व्यवस्थेवरचा विश्‍वासही डळमळीत होतो. त्याचा हा आँखो देखा हाल...

विवाह नोंदणी कार्यालय म्हणजे असुविधांचे आगार अन्‌ एजंटांचा विळखा असे चित्र आहे. त्यामुळे सहजीवनाची सुरवात करणाऱ्या नवदांपत्यांचा हिरमोड होऊन व्यवस्थेवरचा विश्‍वासही डळमळीत होतो. त्याचा हा आँखो देखा हाल...

पुणे - आयुष्याच्या गाठी बांधल्या जातात त्या मंगलमय वातावरणात ! परंतु पुण्यासारख्या स्मार्ट शहरात नवदांपत्यांना नोंदणी विवाह करताना सामोरे जावे लागते ते कोंदट वातावरणाला. शहरातील विवाह निबंधक कार्यालय म्हणजे एक पडकी इमारत. जिथे प्यायला पाणी नाही, बसायची सोय नाही, स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही आणि महत्त्वाचे म्हणजे प्रामाणिकपणे काम होणार याची खात्री नाही. अशा वातावरणात नवदांपत्य सहजीवनाला सुरवात करतात.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी जवळच विवाह निबंधक कार्यालय आहे. या कार्यालयात मोठी वर्दळ असते. दररोज किमान १५-२० जोडप्यांचे विवाह येथे होतात. या कार्यालयाच्या आवारात प्रवेश करतानाच दर्शन होते ते बेशिस्त पार्किंगचे. कार्यालयाच्या परिसरात कोठेही बसायची सोय नाही. येथे अवघे दोन बाक आहेत. ४० अंश सेल्सिअस उन्हाच्या तडाख्यात येथे येणारे लोक उभे राहून आपला नंबर येईपर्यंत उन्हाच्या झळा घेत त्यांना ताटकळत थांबावे लागते. पिण्याच्या पाण्याची येथे व्यवस्थाच नाही. त्यामुळे विकतच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. नटून थटून आलेले वधू-वर आणि नातेवाईक यांच्यासाठी काहीही सोय नाही. ज्येष्ठ नागरिकही काठी टेकत, भिंतीचा आधार घेत उभे राहताना दिसतात. पावसात काय करायचे, हा प्रश्‍नही आहेच.

नोंदणी कार्यालयात कचरा, झाडेझुडपे
दररोज १५०-२०० लोकांची वर्दळ असलेल्या या कार्यालयात महिला आणि पुरुषांसाठी एकच स्वच्छतागृह आहे. एका कोपऱ्यात एक पडक्‍या स्थितीत जुनाट अवस्थेत, झाडेझुडपे वाढलेले अन्‌ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ते आहे. दुर्गंधीमुळे त्याच्या जवळही जाता येत नाही. कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा करणाऱ्या या कार्यालयातील अधिकाऱ्यांसाठी मात्र कार्यालयाच्या आत सुसज्ज स्वच्छतागृह आहे. पण सामान्यांसाठी सोय नाही. 

नोंदणी पद्धतीने वर्षभरात झालेल्या विवाहांची संख्या
4,352 - 2017
1,996 - 2018 21 मे पर्यंत

Web Title: marriage registration office agent