‘त्या’ व्हीआयपी लग्नाची अधुरी कहाणी

Marriage
Marriage

बारामती - तो बसस्थानकावर पेपर, पुस्तके विकायचा. ती एका घरात दत्तक गेलेली. सहा वर्षांपूर्वी त्याचा आणि तिचा परिकथेला शोभावा असा विवाह झाला. हा विवाह संपूर्ण राज्याने दूरचित्रवाहिन्यांवर पाहिला. नवरीला तिची लहानपणी हरवलेली बहीण थेट विवाहाच्या मंडपात भेटली, तो क्षण अनेकांनी डोळ्यांत अश्रू आणून पाहिला. पण, संसाराचा हा भाग जणू भातुकलीच्या खेळामधला अर्धा डावच होता. तोही तिने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या खटल्यात कोर्टाच्या चकरा मारून ५ ऑक्‍टोबर २०१८ रोजी निर्दोष ठरला. ती त्याच्यासोबत राहत नाही. आणि झालेला मुलगा ‘विकून’ टाकलाय. ३ डिसेंबर रोजी त्याचा घटस्फोटही कोर्टाने मंजूर केलाय. अर्थात, आताही तो पेपर आणि पुस्तकेच विकतो. फक्त सामाजिक झगमगाट आणि विवाह संस्थेवर त्याचा विश्वास उरला नाही!

या कहाणीतील रामदास (नाव बदलले आहे) हा दीड वितीच्या पोटासाठी बसस्थानकावर पेपर, पुस्तके विकायचा. २०१४ मध्ये त्याचा विवाह संगीता (नाव बदलले आहे) या अनाथ मुलीशी झाला. संगीता ही लग्न जमल्यानंतर टीव्हीवरील एका मालिकेत आपली बहीण लहानपणीच हरवल्याचे सांगत होती. तिच्या विवाहाच्या दिवशी तरी ती बहीण भेटावी, अशी तिने इच्छा व्यक्त केली. सातारा जिल्ह्यातील एका गावात तिचा नियोजित विवाह होता. 

आश्‍चर्य आणि योगायोग असा, की त्याच मालिकेच्या अभिनेत्यास फोन आला आणि संगीताची लहानपणी हरवलेली बहीण सापडली. एखाद्या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे हा प्रसंग असल्याने सारे लग्नच व्हीआयपी झाले. सगळे शूटिंग महाराष्ट्रातल्या कोट्यवधी प्रेक्षकांनी पाहिले आणि एकाच दिवसात रस्त्यावरचा रामदासदेखील सेलिब्रिटी बनला. त्या लग्नाचे व्हिडिओ आजही सोशल मीडियावर फिरतात. 

काही दिवस मजेत गेले. मुलगी झाली. काही दिवसांनी रामदास-संगीताचे ग्रह बिघडले. संगीताचे दुसऱ्याच एकाशी प्रेम जुळले. ती काही दिवसांतच घर सोडून गेली. मात्र, घर सोडताना नवऱ्याने आपला छळ केला, असा आरोप करून तिने नवरा, दीरासह, सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल केला आणि या नामवंत लग्नाचे दीड वर्षांतच तीनतेरा वाजले. गेली चार वर्षे बारामतीच्या कोर्टात चकरा मारल्यानंतर संगीताला दत्तक घेतलेल्या आईवडिलांनी व स्वतः संगीतानेही आपण गैरसमजातून तक्रार दिल्याचे कोर्टास सांगत नवऱ्याच्याच बाजूने साक्ष दिली आणि रामदास कायद्याच्या कचाट्यातून मुक्त झाला. या दरम्यानच्या प्रवासात धक्कादायक बाब अशी, की रामदासबरोबर संसार सुरू असतानाच्या काळात झालेला मुलगा संगीताच्या प्रियकराने चक्क २५ हजार रुपयांना विकल्याचे कागदोपत्री पुरावेच कोर्टातून रामदासने मिळविले. आई मुलगा विकतेच कशी? हा प्रश्न त्याला छळत राहिला आणि याच पुराव्याच्या जोरावर त्याला ३ डिसेंबर २०१८ रोजी घटस्फोट मिळाला. अखेर या चार वर्षांच्या यातनादायी प्रवासानंतर रामदासला त्याचे ‘व्हीआयपी’ लग्न ही जाणीवपूर्वक रचलेली एक गोष्ट होती, असे समजले, म्हणूनच त्याचा विवाह संस्थेवरच विश्वास उरला नाही. 

‘एका लग्नाची गोष्ट’ नावाने पुस्तक
बहीण भेटली म्हणून रडू कोसळलेली त्याची बायको, पोटच्या पोराला विकताना का रडली नाही? हा प्रश्न त्याला सतावतोय. त्याच्या विवाहाचे सार्वजनिक सेलिब्रेशनदेखील मातीचेच पाय घेऊन जन्मले होते, हे समजून त्याने आजवरच्या घडामोडींवर ‘एका लग्नाची गोष्ट’ नावाचे एक पुस्तकच लिहून ठेवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com