#MarriageIssue धडा शिकविण्यासाठी लढा देणार

पांडुरंग सरोदे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

परदेशात नोकरी करणाऱ्या मुलाशी लग्न हा आजही ‘स्टेटस सिंबॉल’ मानला जातो. मात्र यातून फसवणुकीच्याही अनेक घटना समोर येत आहेत.
अशा प्रकारातून तरुणीच्या आयुष्याची फरफट होते. काहींना तर जीवघेण्या प्रसंगांनाही सामोरे जावे लागते. न्यायासाठी धडपडणाऱ्या अशाच काही तरुणींच्या जिद्दीवर टाकलेला हा प्रकाशझोत.  

परदेशात नोकरी करणाऱ्या मुलाशी लग्न हा आजही ‘स्टेटस सिंबॉल’ मानला जातो. मात्र यातून फसवणुकीच्याही अनेक घटना समोर येत आहेत.
अशा प्रकारातून तरुणीच्या आयुष्याची फरफट होते. काहींना तर जीवघेण्या प्रसंगांनाही सामोरे जावे लागते. न्यायासाठी धडपडणाऱ्या अशाच काही तरुणींच्या जिद्दीवर टाकलेला हा प्रकाशझोत.  

पुणे - परदेशात नोकरी करणाऱ्या तरुणाबरोबर आपण संसार थाटावा, अशी सुप्त इच्छा अनेकींच्या मनात असते. समीराच्या (नाव बदलले आहे) कुटुंबीयांनीही अशाच परदेशी नोकरी करणाऱ्या मुलाशी तिची लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ती परदेशात गेलीही. लग्नापूर्वीच समीराच्या वडिलांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या पतीने लग्नानंतर आपले खरे रंग दाखविले. त्याने परदेशात ‘ग्रीन कार्ड’ मिळाल्यानंतर समीराचे जगणे अवघड केले. तिला मायदेशी जाण्यास भाग पाडले. समीरासारख्या कित्येक मुली पुण्यासह देशभरात न्यायासाठी धडपडत आहेत. पोलिस, पासपोर्ट प्रशासन व सरकारचे उंबरे झिजवत आहेत, फक्त आणि फक्‍त न्यायासाठी ! 

पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील समीराचे दापोलीतील रशीदबरोबर लग्न ठरले. मुलगा न्यूझीलंडमध्ये नोकरी करत असल्याने तिच्या कुटुंबीयांनीही लग्नास तयारी दर्शविली. दरम्यान, रशीदने समीराच्या वडिलांकडून पाच लाख रुपये उसने घेतले. त्यानंतर २५ ऑक्‍टोबर २०१५  रोजी धार्मिक पद्धतीनुसार लग्न झाले. दरम्यान, रशीदने समीराला लग्नानंतर पाच महिन्यांनी न्यूझीलंडला नेले. सुरवातीचे दोन महिने ठीक गेले. त्यानंतर मात्र त्याने तिला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरवात केली. 

रशीदने शिक्षणासाठी आठ वर्षांपूर्वी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी समीराला एका मॉलमध्ये कामाला लावले. बॅंकेमध्ये दोघांचे ‘जॉइंट अकाउंट’ उघडून, त्यातून त्याचे शैक्षणिक कर्ज फेडून घेतले. समीरापासून आर्थिक फायदा होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने तिला मायदेशी जाण्यास सांगितले.

लग्नानिमित्त रशीद पुन्हा भारतात आला. त्यानंतर त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी समीराच्या कुटुंबीयांबरोबर भांडणेही काढली.  त्यानंतर समीराने कोंढवा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तिने पोलिस आयुक्तांपासून ते परराष्ट्र मंत्रालयापर्यंत अनेकांकडे पाठपुरावा केला. मात्र कोणीही या प्रश्‍नाची दखल घेतली नाही. आजही समीरा तिला न्याय मिळावा यासाठी सरकार दरबारी फेऱ्या मारत आहे.

पैशांसाठी रशीदने माझ्याशी लग्न केले. लग्नापूर्वी वडिलांकडून पाच लाख घेतले. त्यानंतर दागिने, पैसेही हडपले. शिवाय मला तेथे काम करायला लावून, स्वतःचे शैक्षणिक कर्जही फेडले. कौटुंबिक छळ व फसवणुकीची तक्रार घेण्यास पोलिस तयार नाहीत. केंद्रीय महिला बाल कल्याण खात्यापासून परराष्ट्र मंत्रालयाशीही पत्रव्यवहार केला. परंतु त्यांच्याकडूनही काही झाले नाही.
- समीरा

Web Title: #MarriageIssue family life