
Pune: चारित्र्याच्या संशयावरून आंबोडीत विवाहितेचा खून
सासवड - येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबोडी (ता.पुरंदर) गावच्या हद्दीत तालुक्यातीलच माळशिरस येथील एका विवाहितेचा तिच्या पतीने आणि सासूने खून केला. ही घटना शनिवारी (ता. २६) घडली. याबाबत सासवड पोलिस ठाण्यामध्ये त्यांवर खुनाचा गुन्हा दाखल आहे.
पुरंदर तालुक्यातील आंबोडी गावच्या हद्दीत असणाऱ्या वनीकरण भागात एक विवाहित महिला अनिता महेश बनकर (रा.माळशिरस, सध्या रा. पुणे) यांचा खून झाला.
यासंदर्भात संशयित आरोपी कमलाबाई पंडित बनकर (सासू), महेश पंडित बनकर (पती) (दोघेही रा.माळशिरस ता.पुरंदर) यांच्या विरोधात फिर्याद दाखल आहे. खुनातील मयत महिलेचा भाऊ अनिल हनुमंत चव्हाण, (वय १८, धंदा- मजुरी, रा. आंबेडकर नगर, मार्केट यार्ड, पुणे) यांनी फिर्याद दाखल केली.
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अनिता महेश बनकर यांची सासू कमलाबाई पंडित बनकर हिने तू नीट वागत नाही,
असे म्हणून व पती महेश पंडित बनकर यांनी संगनमताने अनिता हिचा लग्न झाल्यापासून चारित्र्यावर संशय घेऊन छळ केला. शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कामावरून जाताना फसवून आणले.
वनीकरणामध्ये नेऊन तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार मारले आहे. याबाबतची तक्रार सासवड पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. पुढील तपास सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांना अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे हे करीत आहे.