डाळींच्या दरातील चढ-उतार कायम 

डाळींच्या दरातील चढ-उतार कायम 

पुणे - गेल्या आठवड्याप्रमाणेच डाळींच्या दरातील चढ-उतार कायम राहिला. तूरडाळ, हरभराडाळ आणि उडीदडाळीच्या दरात क्विंटलमागे प्रत्येकी 100 ते 200 रुपयांची घसरण झाली आहे. तर खाद्यतेलांची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. खाद्यतेलांच्या दरात 15 किलोच्या डब्यामागे 20 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र तांदूळ, मसूरडाळ, मटकीडाळ, पोहे, रवा, आटा, मैदा, नारळ, भगर, साबुदाणा, शेंगदाणे, मिरची तसेच काही कडधान्यांचे दर सारखेच राहिले आहेत. 

मार्केट यार्डातील भुसार बाजारात तूरडाळ, हरभराडाळ तसेच उडीदडाळीची आवक वाढल्याने दरात क्विंटलमागे 200 रुपयांची घसरण झाली आहे. तूरडाळीसह अन्य डाळींची आवक वाढली आहे. कडधान्यांमध्ये हरभरा, मटकीचेदेखील दर उतरले आहेत. हरभऱ्याच्या दरात 100 रुपये, तर मटकीचे दर क्विंटलमागे 300 रुपयांनी उतरले आहेत. हरभरा डाळीचे दर उतरल्याने त्याचा परिणाम बेसनाच्या दरावर झाला असून, त्याच्या 50 किलोमागे 100 रुपयांची घट झाली आहे. सध्या बेसनालाही मागणी नाही. त्यामुळे दर उतरण्यास मदत झाली. गोटा खोबऱ्याची आवक चांगली असली, तरी मागणी कमी आहे. त्यामुळे त्याच्या दरात 10 किलोमागे 50 रुपयांनी घट झाली आहे. 

बाजारात नवीन गव्हाची आवक सुरू झाली आहे. राज्यासह मध्य प्रदेश, गुजरातमधून चांगल्या दर्जाच्या गव्हाची आवक बाजारात सुरू आहे. मध्य प्रदेश सरकारने आधारभूत किमतीवर 200 रुपयांचा बोनस गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केला आहे. त्यामुळे या वर्षी दर कमी होणार नाहीत; परंतु चांगल्या प्रतीचा गहू असल्यास एक मार्चपासून तेथील सरकार खरेदी करेल. खरेदी सुरू केल्यास 150 ते 200 रुपयांनी दर वाढण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी वर्तविली. करमाळा, नगर येथून नवीन ज्वारीची आवक सुरू झाली आहे. पुढील पंधरवड्यात आणखी आवक वाढण्याची शक्‍यता आहे. 

होळीच्या सणासाठी गुळाची मागणी वाढली आहे; परंतु सध्या गुळाची आवक कमी होत आहे. त्यामुळे त्याच्या दरात क्विंटलमागे 100 रुपयांनी वाढ झाली आहे. साखरेचे दर गेल्या काही आठवड्यांपासून तेजीत होते. आता त्याच्या दरात मागणी घटल्याने घसरण झाली आहे. 

सध्या खाद्यतेलाची आवक घटली आहे. त्यामुळे आयात केलेल्या तेलावर सध्या भारतीयांना अवलंबून राहावे लागत आहे. सूर्यफूल, सोयाबीन, सरकीच्या तेलामध्ये थोडीशी वाढ झाली आहे. प्रत्येक तेलामध्ये 15 किलोच्या डब्यामागे 15 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com