Video : दिल्लीत साहित्य संमेलनासाठी ‘मसाप’ अनुकूल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

प्रकाशक सहयोगच देतील!
साहित्य संमेलन झाल्यास पुस्तक विक्रीचा मुद्दा प्रकाशकांकडून उपस्थित होऊ शकतो, त्यावर प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘‘प्रकाशकांची भूमिकादेखील मराठीच्या अभिवृद्धीची आहे, त्यामुळे त्यांच्याकडून अडथळा येणार नाही. तेदेखील दिल्लीत अनेकवेळा पुस्तक प्रदर्शनासाठी जात असतात. ते या संमेलनासाठी सहयोगच देतील. एक मोठे काम हाती घेतल्यानंतर सर्व घटकांना एकत्र आणण्यासाठी साहित्यकारण करावे लागते, ते साहित्य महामंडळ करेल.’’

पुणे - मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेनेच लोकचळवळ उभी केली आहे, त्यामुळे दिल्लीत हा मुद्दा ऐरणीवर येणार असेल, तर राजधानीत पुढील वर्षी अखिल भारतीय साहित्य संमेलन घेण्यासाठी साहित्य परिषद अनुकूल आहे, असे स्पष्ट करतानाच तेथील संयोजकांनी मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांना एका छताखाली आणावे, असे प्रतिपादन परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.

दिल्लीत साहित्य संमेलन ही बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यानंतर प्रा. जोशी यांनी ‘मसाप’ची भूमिका स्पष्ट केली. या वेळी दिल्लीत संमेलन घेण्याचा प्रस्ताव देणारे अविनाश चोरडियादेखील उपस्थित होते. प्रा. जोशी म्हणाले, ‘‘अभिजात दर्जा मिळण्यासाठी समिती स्थापन झाली. मराठी भाषा अभिजात असल्याचे सर्व पुरावे केंद्र सरकारला दिले आहेत. परंतु पाच वर्षे हा मुद्दा टोलविला जात आहे, त्यामुळेच ९४ वे साहित्य संमेलन राजधानीत करण्यासाठी निमंत्रण आल्याचा आनंद झाला. तिथे हा अभिजात भाषेचा मुद्दा चर्चीला जावा, यासाठी मसाप सकारात्मक असेल.’’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बडोद्याला संमेलन झाले, त्यापूर्वी दिल्लीकरांकडून निमंत्रण आले होते. त्या वेळीदेखील मसापने या प्रस्तावाला उघड पाठिंबा दिला होता. कारण दिल्लीत अभिजात भाषेचा मुद्दा ऐरणीवर यावा हीच अपेक्षा होती; पण साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती दिल्लीला पाहणी करण्यासाठी जाणार, त्यापूर्वीच तेथील संयोजकांनी निमंत्रण मागे घेतले होते, असे जोशी यांनी सांगितले.

चोरडिया म्हणाले, की या संमेलनाच्या निमित्ताने उत्तर भारतात मला मराठीचा अभिमान उंचावण्याची संधी मिळल्यास ती जबाबदारीने यशस्वी करेन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Masap Favorable for sahitya sammelan in Delhi