पिंपरी - उज्ज्वल भविष्यासाठी मुलांना शिक्षणाची गरज असतेच. मात्र, ज्यांना पोटाची खळगी भरण्याचीच भ्रांत आहे, अशांना त्यापेक्षाही अन्नाची गरज असते. नेमकी हीच गरज ओळखून चिंचवड येथील केटरिंग व्यावसायिक आठ महिन्यांपासून मोफत नाश्ता देण्याचा उपक्रम राबवीत आहेत. रावेत येथील ‘मस्ती की पाठशाला’ या बांधकाम कामगारांच्या मुलांसाठीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत आहे.
‘सहगामी असोसिएशन’ आणि ‘रॉबिनहूड आर्मी’ या संस्थांच्या वतीने रावेत येथे ‘मस्ती की पाठशाला’ ही शाळा चालविण्यात येते. येथे बांधकाम कामगारांची सुमारे ७५ मुले शिक्षण घेतात. शिशुवर्गापासून ते सातवी, आठवीपर्यंतचे वर्ग चालतात. असोसिएशनच्या प्राजक्ता रुद्रवार, रोशनी राय, केतकी नायडू विद्यार्थ्यांना शिकवितात. रॉबिनहूड आर्मीच्या पद्मा राव, शीतल देहाडकर, साई तळवडेकर यांचीही मदत होते.
चिंचवड येथील केटरिंग व्यावसायिक अनिल गादिया रावेत परिसरातील काही शैक्षणिक संस्थांमध्ये खानावळ चालवितात. आठ महिन्यांपूर्वी ‘मस्ती की पाठशाला’ या शाळेबद्दल त्यांना माहिती समजली. त्यांनी रुद्रवार यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना रोज मोफत नाश्ता देण्याची त्यांनी तयारी दर्शविली. रुद्रवार सकाळी हा नाश्ता घेऊन येतात व विद्यार्थ्यांना वाटप करतात. त्यात साबुदाणा खिचडी, पोहे, उपिट, उडीदवडा, पॅटिस असे पदार्थ असतात.
रुद्रवार म्हणाल्या, ‘‘शाळेत नियमित येणाऱ्या आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाश्ता देण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव होते. रोज वेगवेगळा नाश्ता मिळत असल्याने मुलेही खूष असतात. सध्या संस्थेस जागा कमी पडू लागली असून, आणखी एका खोलीची गरज आहे. त्यासाठी आम्ही दानशूर व्यक्तींच्या शोधात आहोत.’’
माझ्या संस्थेत व्यवस्थापक म्हणून काम करणारे महालिंग विभूते हे आध्यात्मिक आहेत. त्यांच्याकडून मला अन्नदानाची प्रेरणा मिळाली. या कामात मुलगा रोहितही खूप मदत करतो.
- अनिल गादिया, केटरिंग व्यावसायिक, चिंचवड
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.