अन्यायाविरोधात मातंग समाजाचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

पुणे - राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मातंग समाजावर अन्याय, अत्याचार, बहिष्काराच्या घटना घडत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच विविध मागण्यांसाठी शनिवारी सारसबागेसमोरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय चौकापर्यंत मातंग संघर्ष महामोर्चा काढण्यात आला.

पुणे - राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मातंग समाजावर अन्याय, अत्याचार, बहिष्काराच्या घटना घडत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच विविध मागण्यांसाठी शनिवारी सारसबागेसमोरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय चौकापर्यंत मातंग संघर्ष महामोर्चा काढण्यात आला.

पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या संयोजन समितीच्या वतीने हा मूक मोर्चा काढण्यात आला. सकाळी साडेदहाच्या सुमारास साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरवात झाली. बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौक, नरपतगीर चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय चौकात मोर्चाचा समारोप झाला. या वेळी मंचावर अंकिता दोडके, ईशा अडागळे, लीना लोंढे, पौर्णिमा लोखंडे, मेघना कसबे, हर्षदा अडागळे, संजना जाधव, हर्षदा मोहिते आदी मुलींनी भाषणे केली.विविध मागण्यांचे नामफलक, पिवळे झेंडे घेऊन शहर आणि जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. विविध संघटनांकडून पाणी, चहा, नाश्‍ता आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, मोर्चामुळे शहरातील मध्य पेठांमधील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक वळविण्यात आली होती. पोलिस प्रशासन व वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मातंग संघर्ष महामोर्चाच्या मागण्या
    अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी ॲट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी 
    मातंग समाजाला अ, ब, क, ड वर्गवारीनुसार आरक्षण मिळावे 
    लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा  
    वस्ताद लहूजी साळवे राष्ट्रीय स्मारकाची उभारणी करावी
    मातंग अभ्यास आयोगाची अंमलबजावणी 
    मागासवर्गीय महामंडळांची थकीत कर्जमाफी माफ करावी 
    भीमा कोरेगाव दंगलीतील हल्लेखोरांवर कडक कारवाई व्हावी  

क्षणचित्रे
    राज्यघटनेतील प्रस्ताविकेच्या सामूहिक वाचनाने महामोर्चाला सुरवात
    पिवळ्या साड्या आणि पोषाख घालून महिला व युवतींचा उत्स्फूर्त सहभाग
    ड्रोन कॅमेऱ्यातून महामोर्चाचे चित्रीकरण
    स्वयंसेवकांकडून शिस्तीचे प्रदर्शन
    विविध संघटनांकडून चहा, नाश्‍ता, पिण्याचे पाणी व अन्नदानाची सोय
    महामोर्चानंतर स्वयंसेवकांकडून स्वच्छता अभियान

Web Title: Matang Society Rally