प्रसूतिपूर्व रजा नाकारणाऱ्या आयटी कंपनीवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

पिंपरी - नोकरी करणाऱ्या महिलांना प्रसूतिपूर्व अर्जित रजा आयटी कंपन्यांनी नाकारली होती. कंपनीकडून रजा नाकारल्याबद्दल दिली जाणारी भरपाईची रक्‍कम संबंधित महिलांना मिळवून देण्याचे काम कामगार आयुक्‍त कार्यालयाकडून करण्यात आले. सहायक कामगार आयुक्त निखिल वाळके यांनी "सकाळ'ला ही माहिती दिली. 

पिंपरी - नोकरी करणाऱ्या महिलांना प्रसूतिपूर्व अर्जित रजा आयटी कंपन्यांनी नाकारली होती. कंपनीकडून रजा नाकारल्याबद्दल दिली जाणारी भरपाईची रक्‍कम संबंधित महिलांना मिळवून देण्याचे काम कामगार आयुक्‍त कार्यालयाकडून करण्यात आले. सहायक कामगार आयुक्त निखिल वाळके यांनी "सकाळ'ला ही माहिती दिली. 

पाच महिन्यांपूर्वी प्रसूतिपूर्व रजा नाकारल्यामुळे काही महिला कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात कामगार आयुक्‍तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर याबाबत सुनावणी घेऊन यावर निर्णय घेण्यात आला. प्रसूतिपूर्व अर्जित रजा न देणाऱ्या कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात आल्याचेही, वाळके यांनी सांगितले. 

प्रसूतिपूर्व रजा नाकारणाऱ्या कंपन्यांची कामगार आयुक्‍त कार्यालयाकडून तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये रेकॉर्ड रजिस्टर न ठेवणे, कामगार आयुक्‍त कार्यालयाकडे मॅटर्निटी रिटर्न न भरणे, महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतिपूर्व अर्जित रजेचे फायदे न देणे असे प्रकार केल्याचे आढळून आले होते. कामगार कायद्यानुसार महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतिपूर्व अर्जित रजेसाठी देण्यात आलेले फायदे कंपन्यांनी देणे आवश्‍यक आहे. मात्र या कंपन्यांनी कायद्याचे उल्लंघन केले होते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे वाळके या वेळी म्हणाले. 

कामगार आयुक्‍तालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे पथक कंपन्यांना भेट देऊन त्याची माहिती जमा करतात. एखाद्या ठिकाणी यासंदर्भात कोणती तक्रार आल्यास त्याची तत्काळ दखल घेण्यात येत असल्याचे, वाळके यांनी सांगितले. 

फायदे मिळत नसल्यास तक्रार करा 
कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतिपूर्व अर्जित रजा देण्यासाठी किंवा त्याचे फायदे देण्यास कंपनी टाळाटाळ करत असेल तर त्यांनी थेट कामगार आयुक्‍त कार्यालयात तक्रार करण्याचे आवाहन वाळके यांनी केले आहे. महिला कर्मचाऱ्यांकडून तक्रार आल्यानंतर त्याची छाननी करण्यात येईल, त्यावर सुनावणी घेऊन त्याबाबतचा निर्णय देण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

Web Title: Maternity leave Action on IT Company