पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयावर माथाडींचा मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

माथाडी कामगारांच्या नावाने सुरू असलेली गुंडगिरी मोडून काढावी, त्यांच्यावर कारवाई करावी, असा मागण्यांसाठी हमाल पंचायत व अन्य संघटनांनी गुरुवारी (ता. 25) पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढला. 

चिंचवड : माथाडी कामगारांच्या नावाने सुरू असलेली गुंडगिरी मोडून काढावी, त्यांच्यावर कारवाई करावी, असा मागण्यांसाठी हमाल पंचायत व अन्य संघटनांनी गुरुवारी (ता. 25) पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढला. 

चिंचवड स्टेशन येथून मोर्चाला सुरवात झाली. हमाल पंचायतीसह क्रांती कष्टकरी पथारी महासंघ, पथारी व्यावसायिक पंचायत, रिक्षा पंचायत आणि नागरी हक्क सुरक्षा महासंघ आदी संघटनांचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. हमाल पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, नितीन पवार, मानव कांबळे, गोरख मेंगळे, शैलजा चौधरी, संतोष नांगरे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. "नही चलेगी नही खंडणीशाही नही चलेगी', "माथाडी हमाल झिंदाबाद, खंडणीखोर मुर्दाबाद' अशा घोषणा माथाडी कामगारांनी दिल्या. 

डॉ. आढाव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, "माथाडीचे सोंग घेऊन खंडणी वसूल करणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करावा. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणाऱ्या भारतीय दंड संहितेतील कलम 353 चा वापर माथाडी कामगारांच्या चळवळीसाठी करू नये. हातगाडी-पथारी व्यावसायिकांना त्रास देणारे गुंड व स्वयंघोषित पुढाऱ्यांवर आणि बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी.' 

दरम्यान, आयुक्तालयासमोर झालेल्या सभेत डॉ. आढाव म्हणाले, "आपले अधिकार व हक्कासाठी आपण शेवटपर्यंत लढा दिला पाहिजे. बोगस माथाडी संघटनांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे. सरकारने सर्वांना समान न्याय द्यावा. माथाडी कामगारांनी आवाज उठवलाच पाहिजे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mathadi Workers march on Pimpri Chinchwad Police Commissioner Office