पावसाचा जोर वाढल्याने विसर्ग सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

बुधवारी पावसाचा जोर कमी होता. गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत लोणावळा येथे 43, कार्ला येथे 58, पवनानगर येथे 57, कामशेत येथे 53, वडगाव येथे 19, तळेगाव दाभाडे येथे 17, वडिवळे 28 व शिवणे येथे 62 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

वडगाव मावळ : मावळ तालुक्‍यात शुक्रवारी (ता. 9) सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे त्यामुळे धरणातील विसर्ग कायम आहे. हे प्रमाण कमी असल्याने पूरस्थिती नियंत्रणात असून, इंद्रायणी व पवना नदी पुलांवरील वाहतूक सुरळीत होती. 

बुधवारी पावसाचा जोर कमी होता. गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत लोणावळा येथे 43, कार्ला येथे 58, पवनानगर येथे 57, कामशेत येथे 53, वडगाव येथे 19, तळेगाव दाभाडे येथे 17, वडिवळे 28 व शिवणे येथे 62 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शुक्रवारी सकाळपासून मात्र पावसाने पुन्हा जोर धरला. दिवसभर पावसाच्या हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे धरणातील पाणी विसर्ग कायम ठेवण्यात आला. पवना धरणातून 3 हजार 334, वडिवळे धरणातून 1 हजार 256, आंद्रा धरणातून 3 हजार 690, ठोकळवाडी धरणातून 2 हजार 573, जाधववाडी धरणातून 109, तर कासारसाई धरणातून 700 क्‍युसेक विसर्ग सुरू होता. त्यामुळे पाऊस वाढला तरी विसर्ग वाढवावा लागला नाही. परिणामी, इंद्रायणी व पवनेच्या पूरस्थितीवर नियंत्रण असून व या दोन्ही नद्यांवरील पुलांवरून वाहतूक सुरळीत होती. पावसाचा जोर कायम असला तरी त्याचे प्रमाण कमी असल्याने तालुक्‍यात कोठेही पूरस्थिती नसल्याची माहिती नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली. 

विसर्ग सुरू असल्याने साठ्यात घट 
पावसाचे प्रमाण कायम असल्याने व पावसाचे दिवस बाकी असल्याने धरणातून विसर्ग करून पाणीसाठ्याची पातळी कमी केली जात आहे. त्यामुळे पाणीसाठ्याची टक्केवारी कमी झाली आहे. पवना धरणात 92.82 टक्के साठा असून, धरण परिसरात आतापर्यंत 2 हजार 906 मिलिमीटर पाऊस झाला आहे. वडिवळे धरणात 96.28 टक्के साठा आहे. धरण परिसरात आतापर्यंत 3 हजार 423 मिलिमीटर पाऊस झाला आहे. आंद्रा धरण शंभर टक्के भरले असून, सांडव्यावरून विसर्ग सुरू आहे. धरण परिसरात आतापर्यंत 1 हजार 629 मिलिमीटर पाऊस झाला आहे. कासारसाई धरण 88 टक्के, तर जाधववाडी धरण शंभर टक्के भरले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maval area dam water continuous realesing