मावळला विकासाचे मॉडेल बनविणार - सुनील शेळके

वडगाव मावळ - नगरपंचायतीच्या सत्कार समारंभात बोलताना आमदार सुनील शेळके.
वडगाव मावळ - नगरपंचायतीच्या सत्कार समारंभात बोलताना आमदार सुनील शेळके.

वडगाव मावळ - ‘सरकार कोणाचेही येवो जास्तीत जास्त निधी आणून सर्वांच्या सहकार्याने मावळ तालुक्‍याला विकासाचे मॉडेल बनविण्यासाठी प्रयत्नशील राहील,’’ अशी ग्वाही आमदार सुनील शेळके यांनी दिली. आरोग्यासारख्या मूलभूत समस्येसाठी गोरगरिबांना कोणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ नये, यासाठी तालुक्‍यात जिल्हा रुग्णालय उभारण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.

वडगाव नगरपंचायतीच्या वतीने सोमवारी आमदार शेळके यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. नगरपंचायतीच्या प्रांगणात आयोजित या समारंभाला माजी राज्यमंत्री मदन बाफना, बाबूराव वायकर, गणेश ढोरे, भास्करराव म्हाळसकर, बाळासाहेब ढोरे, सोपानराव म्हाळसकर, सुभाष जाधव, पंढरीनाथ ढोरे, तुकाराम ढोरे, बाळासाहेब शेळके, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले आदी उपस्थित होते. 
या वेळी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे तसेच नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष दालनाचे उद्‌घाटन शेळके यांच्या हस्ते झाले. 

शेळके म्हणाले, ‘‘जनतेने जेवढ्या मताधिक्‍क्‍याने निवडून दिले आहे, तेवढी जबाबदारीही वाढली आहे. तालुक्‍यात पुनर्वसन, रस्ते, पूल, आरोग्य आदी विविध समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्‍यक आहे. निवडणुकीपुरते राजकारण ठीक आहे. विकासकामांसाठी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवणे गरजेचे आहे. तालुक्‍यातील कंपन्या व सामाजिक संस्थांनी विकासकामांसाठी पुढाकार घ्यावा. सरकार कोणाचेही येवो, जास्तीत जास्त निधी आणून तालुक्‍याचा सर्वांगीण विकास करण्याचा व न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.’’ 

नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी प्रास्ताविकात नगरपंचायतीची विस्तारित इमारत, शहराची विस्तारित पाणी योजना, वडगाव-तळेगाव साखळी रस्ता आदी कामांसाठी निधी देण्याची मागणी शेळके यांच्याकडे केली. आता गर्दीत हरवून न जाता विकासकामांकडे लक्ष केंद्रित करण्याचा व पदापेक्षा कामांतून मोठे होण्याचा सल्ला बाफना यांनी दिला. उपनगराध्यक्ष राहुल ढोरे यांनी स्वागत केले. नगरसेवक चंद्रजित वाघमारे व माया चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. पूजा वहिले यांनी आभार मानले. गटनेते राजेंद्र कुडे, प्रमिला बाफना, दिनेश ढोरे आदींनी संयोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com