काहिलीने पुणेकरांची घालमेल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

शहर आणि परिसरात मतदानाच्या दिवसापासून म्हणजे २३ मार्चपासून उन्हाचा चटका वाढू लागला आहे. त्यापूर्वी कमाल तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. पण, आता त्याने चाळिशी ओलांडली आहे.

पुणे - उन्हाचा चटका वाढल्याने पुणेकर हैराण झाले आहेत. बाहेर उन्हाचा चटका आणि घरात उकाडा, अशा स्थितीत पुणेकरांनी गुरुवारचा दिवस काढला. विजेच्या लपंडावाने या त्रासात आणखी भर पडली.

शहर आणि परिसरात मतदानाच्या दिवसापासून म्हणजे २३ मार्चपासून उन्हाचा चटका वाढू लागला आहे. त्यापूर्वी कमाल तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. पण, आता त्याने चाळिशी ओलांडली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सूर्य आग ओकत असल्याने पुणेकर उकाड्याने त्रस्त झाल्याचे चित्र होते. सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचा चटका वाढायला सुरवात होते. सोसायट्यांमध्ये पूर्वेकडे खिडक्‍या-दारे असणाऱ्यांचे घर सकाळपासून उन्हात तापू लागते. रस्त्यांवर सिग्नलला थांबताना झाडाची किंवा एकाद्या इमारतीची सावली बघून दुचाकीचालक थांबत असल्याचे चित्र चौकाचौकांत दिसते. 

उन्हाच्या चटक्‍यामुळे घरची किंवा ऑफिसची बाहेरील कामे दुपारपूर्वी करण्याचे नियोजन करण्यावर भर दिला जात असल्याचे मेडिकल रिप्रेझंटेटिव्ह कुणाल कुलकर्णी यांनी सांगितले. दुपारच्या वेळी लोकांना स्कार्फ, गॉगल्स, टोपी, सनकोटशिवाय बाहेर पडणे शक्‍य होत नाही, अशी सध्याची स्थिती आहे. 

पूर्वेकडे घराचे टेरेस असल्याने सकाळपासूनच घरात उन्हाचा चटका लागतो. दार, खिडक्‍या बंद करून पडदे लावले, तरीही गरम होते. त्यामुळे दुपारपर्यंत हा त्रास सहन करण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यासाठी सकाळी नऊ वाजण्यापूर्वी स्वयंपाक करावा लागतो.
- गौरी दामले, निरव सोसायटी, सिंहगड रस्ता

Web Title: maximum temperature in Pune is 40 degree Celsius