राज्यात उन्हाचा चटका वाढला परभणीत उच्चांकी तापमानाची नोंद

Maximum temperature
Maximum temperature

पुणे : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच आता उन्हाचा चटकादेखील वाढत आहे. राज्यात यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदा उच्चांकी 40.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद परभणी येथे सोमवारी झाली. पुढील चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता असून, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

राज्यात तापमान वाढत असल्याने उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कमी झाल्याने गारठा कमी होत आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. राज्यात सोमवारी प्रथमच कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदला गेला. यापूर्वी यवतमाळ येथे शनिवारी (ता. 9) 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. 

मध्य महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भात एक-दोन अपवाद वगळता राज्यात कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे; तसेच विदर्भ, मराठवाडा, दक्षिण कर्नाटकपर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित होऊन द्रोणीय स्थिती निर्माण होत असल्याने पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. सोमवारी दुपारनंतर पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात आकाश ढगाळ हवामान झाले होते. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात पुढील दोन दिवसांमध्ये पावसाची शक्‍यता आहे; तसेच गुरुवारपर्यंत (ता. 14) विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. 
दरम्यान, पुण्यात सोमवारी अतिनील किरणांचा निर्देशांक 3.4 पर्यंत वाढल्याचे "सफर'तर्फे नोंदविण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतची ही सर्वाधिक पातळी ठरली आहे. 

पुण्यात तापमान घसरणार 
पुण्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 1.4 अंश सेल्सिअसने वाढून 36.1 अंश सेल्सिअस नोंदला गेला. किमान तापमान 14.3 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुढील दोन दिवसांमध्ये मात्र काही अंश किमान तापमानाचा पारा कमी होईल, असा अंदाज आहे. 

राज्यातील उच्चांकी तापमान (सर्व आकडे अंश सेल्सिअसमध्ये) 
1 मार्च ः सोलापूर ः 36.6 
2 मार्च ः मालेगाव ः 38.8 
3 मार्च ः सोलापूर ः 37.9 
4 मार्च ः नगर ः 37.1 
5 मार्च ः नगर ः 37 
6 मार्च ः चंद्रपूर ः 36 
7 मार्च ः सोलापूर ः 36.5 
8 मार्च ः मालेगाव ः 37.8 
9 मार्च ः यवतमाळ ः 39 
10 मार्च ः मालेगाव ः 38.8 
11 मार्च ः परभणी ः 40.1 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com