महापौरांनीच घेतली ई-बसची चाचणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

चिखली - बॅटरीवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक तीस आसनी इलेक्‍ट्रिक बसची चाचणी महापौर राहुल जाधव यांनी स्वतः बस चालवून घेतली. वातानुकूलित आणि संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या बसचा प्रवास आल्हाददायक आहे. ही बस यशस्वीरीत्या सुरू झाल्यास पुणे व पिंपरी-चिंचवडकरांचा प्रवास सुखकर होणार असल्याची भावना या वेळी उपस्थित नागरिकांनी बोलावून दाखवली. 

चिखली - बॅटरीवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक तीस आसनी इलेक्‍ट्रिक बसची चाचणी महापौर राहुल जाधव यांनी स्वतः बस चालवून घेतली. वातानुकूलित आणि संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या बसचा प्रवास आल्हाददायक आहे. ही बस यशस्वीरीत्या सुरू झाल्यास पुणे व पिंपरी-चिंचवडकरांचा प्रवास सुखकर होणार असल्याची भावना या वेळी उपस्थित नागरिकांनी बोलावून दाखवली. 

शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी सुरवातीला भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या बसची गुरुवारी जाधववाडी येथे चाचणी घेण्यात आली. या वेळी महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर, नगरसेविका साधना मळेकर, नगरसेवक राजू मिसाळ, महापालिका अधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

बसबाबत माहिती देताना महापौर म्हणाले, ‘‘शहरातील सार्वजनिक वाहतूक बळकट करण्यासाठी, तसेच प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने पीएमपीएमएलसाठी २५ पर्यावरणपूरक इलेक्‍ट्रिक बस दहा वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. प्रत्येक किलोमीटरला चाळीस रुपये बत्तीस पैसे यानुसार कंपनीला भाडे देण्यात येणार आहे. पंचवीस बसपैकी दहा पिंपरी-चिंचवडसाठी, तर १५ पुण्यासाठी असतील. सुरवातीला भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या या बस सुरळीत चालल्यास तशा बस विकत घेण्याचा महापालिकेचा मानस आहे.’’

इलेक्‍ट्रिक बसची वैशिष्ट्ये
 आवाज आणि प्रदूषणविरहित
 आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर 
 तीसहून अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता
 डिझेल, सीएनजी बसच्या तुलनेत देखभाल खर्च कमी
 मोठा चढ सहज पार करण्याची क्षमता
 बॅटरी चार्ज केल्यानंतर सुमारे २५० किमी धावते. 
 बॅटरी डिसचार्ज झाल्यानंतरही तीन कि.मी. धावते. 
 तीन तासांत बॅटरी चार्ज होते. 

 हैदराबादमधील ओलोक्‍ट्रा कंपनीने या बस तयार केल्या आहेत. अंतर्गत रस्त्यावर प्रवासी वाहतूक करण्यासाठी सुरवातीला नऊ मीटर लांबीच्या २५, बीआरटी मार्गासाठी बारा मीटर लांबीच्या १२५ बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवडच्या बससाठी निगडी येथे चार्जिंग पॉइंट देण्यात आला आहे.  
- सुनील बोरसे, मुख्य अभियंता, पीएमपीएमएल

सध्या उपलब्ध असलेल्या पीएमपीएमएलच्या बसमधून प्रवास करणे मोठे जिकिरीचे काम आहे. मात्र, गुरुवारी चाचणी घेण्यात आलेल्या इलेक्‍ट्रिक बसमधून मोटारीपेक्षाही आल्हाददायक प्रवास केल्याचा अनुभव आला. त्यामुळे या बस उपलब्ध करून दिल्यास त्या पर्यावरणपूरक बसमधून प्रवास करायला आवडेल.
- अंकुश मळेकर, चिखली

Web Title: Mayor E-Bus Testing