महापौरपद दहा महिन्यांसाठी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौरपदी पाच वर्षांत सहा नगरसेवकांना संधी मिळावी, म्हणून एका सदस्याला फक्त दहा महिने संधी देण्याचा विचार भाजपमध्ये सुरू आहे. 

महापालिकेत  १२८ पैकी ७८ सदस्यांचे संख्याबळ भाजपचे असल्याने महापौर-उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षांसह सर्व विषय समित्यांवरही भाजपचे निर्विवाद वर्चस्व असणार आहे. या वेळी पिंपरी-चिंचवडचे महापौरपद इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौरपदी पाच वर्षांत सहा नगरसेवकांना संधी मिळावी, म्हणून एका सदस्याला फक्त दहा महिने संधी देण्याचा विचार भाजपमध्ये सुरू आहे. 

महापालिकेत  १२८ पैकी ७८ सदस्यांचे संख्याबळ भाजपचे असल्याने महापौर-उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षांसह सर्व विषय समित्यांवरही भाजपचे निर्विवाद वर्चस्व असणार आहे. या वेळी पिंपरी-चिंचवडचे महापौरपद इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव आहे.

नियमाप्रमाणे महापौरपदाची मुदत ही अडीच वर्षे असते. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर अडीच वर्षे पदावर होते. मागील पंचवार्षिकमध्ये ‘राष्ट्रवादी’नेही पाच सदस्यांना संधी मिळावी म्हणून पाच जणांना संधी देण्यासाठी प्रत्येकी एक वर्ष मुदतीचा प्रस्ताव मांडला होता. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही. 

प्रदेश भाजप; तसेच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौरपदावर अधिक कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी नवा पायंडा सुरू करण्याची सूचना केली आहे. स्थानिक नेत्यांनीही त्याला होकार दिल्याचे समजले. ओबीसी प्रवर्गातील भाजपचे एकूण १४ नगरसेवक आहेत. त्यात नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, नितीन काळजे यांची नावे प्रामुख्याने महापौरपदासाठी चर्चेत आहेत. त्यांच्याशिवाय अन्य सात सदस्य इच्छुक आहेत. दहा महिन्यांसाठी एकाला संधी मिळाल्यास या तिघांनाही महापौर होता येणार आहे. काटे यांची दुसरी टर्म असली, तरी भाजपमधील सर्वांत ज्येष्ठ म्हणून ढाके यांना पहिला मान मिळण्याची शक्‍यता आहे.

निर्णय १४ मार्चला?
गेल्या पंचवार्षिकमधील नगरसेवकांची मुदत १२ मार्चला संपुष्टात येणार असल्याने १४ मार्चला महापौरपदाची निवडणूक घेण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. मात्र, ती विभागीय आयुक्‍तांचा प्रतिनिधी यांच्या उपलब्धतेवर अवलंबून असणार आहे.

नुकत्याच झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. यामुळे भाजपचा पहिला महापौर कोण? याबाबत शहरवासीयांना उत्सुकता आहे. २०१२ मधील महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत १२ मार्चला संपुष्टात येत आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सदस्य यांची निवड एकाच दिवशी करता येते. त्यासाठी विभागीय आयुक्‍तांचा प्रतिनिधी यासाठी येतो. निवडणुकीच्या किमान तीन दिवस आधी महापौर पदासाठी अर्ज स्वीकृती होते. त्यानंतर आलेल्या अर्जांची छाननी होते. त्यामुळे १४ मार्चला निवडणूक घ्यायची असल्यास ९ मार्चला अर्ज स्वीकृती व १० मार्चला आलेल्या अर्जांची छाननी होईल. मात्र, ११ मार्चला दुसरा शनिवार व १२ मार्चला रविवार, १३ मार्चला धूलिवंदन अशी सलग महापालिकेला सुटी आहे. त्यामुळे १४ मार्च रोजी महापौर पदासाठी निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. विभागीय आयुक्‍तांच्या प्रतिनिधीने दुसरी तारीख दिल्यास निवडणुकीच्या वेळेत बदल होऊ शकतो, असे महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी सांगितले.

विभागीय आयुक्‍तांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत महापौरांची निवड झाल्यावर ते सभा तहकूब करतात, अशी प्रथा आहे. त्यामुळे उपमहापौर, स्थायी समिती सदस्य व इतर समित्यांच्या सभासदांची निवड महापौरांनी तारीख दिल्यानंतर होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: mayor post 10 month