महापौरपदाचा कार्यकाल टिळक पूर्ण करणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

पुणे - विधानसभा निवडणुकीत महापौर मुक्ता टिळक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे निवडून आले, तरी ते महापालिकेतील आपल्या पदाचा कार्यकाल पूर्ण करणार आहेत. टिळक यांच्या पदाची मुदत डिसेंबरपर्यंत असून, कांबळे आणखी पाच-सहा महिने या पदावर राहतील. नव्या बसगाड्यांची खरेदी होईपर्यंत सिद्धार्थ शिरोळे पीएमपीच्या संचालकपदी कायम राहणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातील नऊपैकी पाच नगरसेवक आमदार झाले आहेत. त्यात टिळक, कांबळे यांच्यासह शिरोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे, सुनील टिंगरे यांचा समावेश आहे. विधानसभेत गेल्याने ते नगरसेवक आणि अन्य पदांचा राजीनामा देणार का, याबाबतची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे. 

टिळक यांचा अडीच वर्षांचा काळ सप्टेंबरमध्ये संपला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे या पदाची सोडत पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील सर्वच महापौरांना तीन महिन्यांची म्हणजे डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली. त्यानुसार टिळक पुढील दोन महिने या पदावर कायम राहतील. स्थायी समितीचा एक वर्षाचा कार्यकाळ कांबळे पूर्ण करतील. तसेच नव्या बसगाड्यांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू असून ती पुढील काही दिवसांत पूर्ण होईल. तोपर्यंत शिरोळे पीएमपीच्या संचालकपदी कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले.

विरोधक करू शकतात संख्याबळवाढीचा प्रयत्न?
शहरातील भाजपचे तीन आणि ‘राष्ट्रवादी’चे दोन असे एकूण पाच नगरसेवक आमदार झाले आहेत. त्यामुळे ते नगरसेवक पदाचा राजीनामा देतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र शहरात भाजपची पडझड झाल्याने या पक्षाचे नगरसेवक राजीनामा देतील का, याबाबत साशंकता आहे. सध्याच्या राजकीय वातावरणाचा फायदा घेऊन महापालिकेत संख्याबळ वाढविण्यासाठी तुपे आणि टिंगरे हे राजीनामा देऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. याआधी नगरसेवक असताना मेधा कुलकर्णी आणि योगेश टिळेकर आमदार झाले होते. मात्र त्यांनी राजीनामा दिला नव्हता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayor will complete its term Mukta Tilak