आळंदी पालिकेच्या कामात नगराध्यक्षांच्या पतीचा हस्तक्षेप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

आळंदी : नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांचे पती आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या पालिकेच्या कारभारातील वाढत्या हस्तक्षेपाबाबत अनेकदा तक्रारी करूनही पालकमंत्री गिरीश बापट आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही. मात्र, काल गुरूवारी (ता.23) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश विसर्जनाच्या कार्यक्रमात कांबळे यांनी पालिकेच्या वतीने श्रद्धांजली वाहिली.याशिवाय पालिकेच्या वतीने दिवंगत वाजपेयींचे स्मारक उभारण्याचा संकल्पही जाहीर केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. 

आळंदी पालिकेत अठरापैकी सध्या दहा महिला नगरसेवक म्हणून कारभार करत आहेत. पालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या वैजयंता उमरगेकर निवडून आल्या. स्वत: उमरगेकर दोनवेळा पालिकेवर नगरसेवक म्हणून यापूर्वी निवडून गेल्याने त्यांना पालिकेच्या कामकाजाची ब-यापैकी माहिती आहे. मात्र, नगराध्यक्ष झाल्यावर त्यांचे पती पालिकेच्या प्रत्येक कामात लक्ष घालत असल्याचे चित्र आहे.

स्थानिक बैठक असो, की जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्या बैठकीत पालिकेच्या वतीने स्वत:च विषय मांडत आहेत. त्यांच्या हस्तक्षेपास आजपर्यंत पालिकेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी अद्याप विरोध केला नाही. मात्र स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांकडे याबाबत वारंवार तक्रारी करूनही कांबळेंच्या हस्तक्षेपावर अद्याप कारवाई करण्यात आली नाही.

कांबळे यांच्या हस्तक्षेपाचा अनुभव पुन्हा एकदा काल गुरूवारी (ता.२३) वाजपेयींच्या अस्थिकलश विसर्जनाच्या निमित्ताने पाहायला मिळाला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार संजय भेगडे, आमदार महेश लांडगे, बाबूराव पाचर्णे यांसह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते. पालकमंत्री गिरीश बापट हे अस्थिकलशाच्या पूजनास बसले. तर कांबळे यांनी ध्वनिक्षेपकाचा ताबा घेत स्वत:च श्रद्धांजली वाहू लागले.

यामध्ये कांबळे यांनी सांगितले, की आळंदी हे स्थान महत्वाचे आहे. देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीचे स्मारक आळंदीत आहे. जेवढे राष्ट्रीय नेते स्वर्गवासी झाले निघून गेले. सर्वांच्या अस्थी आळंदीत इंद्रायणीत विसर्जनासाठी आणल्या. याठिकाणी पालकमंत्री, राज्यमंत्री, आमदार उपस्थित होते. सर्वांच्या साक्षीने सांगतो की, आळंदीत महात्मा गांधीजींचे स्मारक ज्याठिकाणी आहे. त्याच शेजारी आळंदी नगरपालिकेच्या वतीने अटलजींचे स्मारक बांधून देऊ, असे जाहीर वक्तव्य कांबळेंनी केले आणि उपस्थित अनेकांच्या भुवया उंचावल्या.

वास्तविक याठिकाणी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक उपस्थित होते. मात्र, सर्वांच्या तोंडी एकच चर्चा पालिकेच्या वतीने कांबळे कसे काय बोलू शकतात. पालिकेत बहुतांश महिला नगरसेवकांचे नातेवाईक हस्तक्षेप करत आहेत. महिला नेतृत्व सबल व्हावे, यासाठी आरक्षण ठेवले. मात्र, कारभार नातेवाईकच करत असल्याचे चित्र आळंदी पालिकेत पाहायला मिळत आहे. भाजप हा शिस्तीचा पक्ष असलातरी कांबळे यांच्याबाबत पक्षाने शिस्त गुंडाळल्याचे चित्र आळंदी पालिकेत यानिमित्ताने पाहायला मिळाले.

Web Title: Mayors husbands intervention in Alandi municipal work