बनावट अधिवासाद्वारे वैद्यकीय प्रवेश 

गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पुणे - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाराष्ट्रातील अधिवासाचे बनावट प्रमाणपत्र संरक्षण दलात असलेल्या केरळ आणि राजस्थान येथील दोन अमराठी कर्मचाऱ्यांनी तयार करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रमाणपत्राआधारे "डी2' या राखीव कोट्यातून त्यांनी त्यांच्या पाल्यांना प्रवेशही मिळविले; परंतु वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने ते आता रद्द केले आहेत. 

पुणे - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाराष्ट्रातील अधिवासाचे बनावट प्रमाणपत्र संरक्षण दलात असलेल्या केरळ आणि राजस्थान येथील दोन अमराठी कर्मचाऱ्यांनी तयार करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रमाणपत्राआधारे "डी2' या राखीव कोट्यातून त्यांनी त्यांच्या पाल्यांना प्रवेशही मिळविले; परंतु वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने ते आता रद्द केले आहेत. 

संरक्षण दलाच्या सेवेत कार्यरत असलेला कर्मचारी वा अधिकाऱ्यांच्या पाल्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी राखीव कोटा (डी2) असतो. महाराष्ट्रातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत या कोट्यासाठी 22 जागा राखीव आहेत. त्यावर प्रवेश पाहिजे असल्यास महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र बंधनकारक असते. परंतु या जागा महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी राखीव असतानाही प्रवेशासाठी राज्याबाहेरील व्यक्तींकडून बनावट अधिवासाचा वापर करण्यात आला आहे. 

पुण्यातून दोन कर्मचाऱ्यांनी बनावट प्रमाणपत्र मिळवत त्या आधारे आपल्या पाल्यांना वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. हवेली तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात रहिवास दाखवून ही प्रमाणपत्रे त्यांनी मिळविली आहेत. या कार्यालयाने प्रमाणपत्राची तपासणी केली असून, त्याचा अहवाल वैद्यकीय शिक्षण संचालनालयास पाठविला आहे. त्यात, एका अधिकाऱ्याने त्याच्या पाल्याच्या प्रवेशासाठी सादर केलेले प्रमाणपत्र आमच्या कार्यालयाने दिलेले नसल्याचे म्हटले आहे. 

राजस्थानचा रहिवासी असलेल्या कर्मचाऱ्याने पाल्याच्या प्रवेशासाठी दिलेल्या अधिवास प्रमाणपत्रावरील क्रमांक हा महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या एका महिला नागरिकाच्या नावे दिसून येत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्याने हा प्रकार समोर आणाला आहे. केवळ पुण्यातच नव्हे; तर मुंबईत पाच आणि नाशिक येथे दोघांनी अशा प्रकारे बनावट अधिवास प्रमाणपत्र बनविल्याची त्यांची तक्रार आहे. तेथील महसूल यंत्रणेकडून त्याची चौकशी सुरू झाली आहे. 

मराठी विद्यार्थ्यांचे नुकसान 
"मनविसे'चे पदाधिकारी विक्रांत भिलारे म्हणाले, ""राज्यातील डी2 या कोट्यातून महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्रवेश मिळायला हवा; पण त्या जागांवर राज्यबाहेरील लोकांनी अतिक्रमण केल्याने राज्यातील मूळ रहिवासी विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी मुकले आहेत. अशी बनावट प्रमाणपत्रे तातडीने रद्द करावीत आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत.'' 

पुण्यातील दोघांची अधिवास प्रमाणपत्रे बनावट असल्याने त्यांच्या दोन पाल्यांचे प्रवेश रद्द केले आहेत. नाशिक, मुंबई येथेही असे प्रकार घडल्याची तक्रार आहे. ते बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यास त्या आधारे झालेले प्रवेश रद्द होतील. 
- डॉ. प्रवीण शिनगारे (संचालक, वैद्यकीय शिक्षण संचालनालय) 

नाशिकमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या दाखल्यांची चौकशी करण्यात येत आहे. तहसीलदारांच्या चौकशीत दाखले बोगस असल्याचे आढळल्यास संबधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याबरोबर त्यांचे प्रवेश रद्द करण्यासाठी शिफारस केली जाईल. 
- राधाकृष्णन बी. (जिल्हाधिकारी, नाशिक) 

Web Title: Medical admission through fake residence