‘आयसीयू’तून औषधांच्या टिप्स

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

औषध विक्रेत्यांनी रुग्णालयांच्या ‘आयसीयू’मध्ये हेर पेरले आहेत. ते तुमचा मोबाईल क्रमांक रुग्णालयाच्या परिसरातील औषध विक्रेत्यांना देतात. या नव्या ‘प्रॅक्‍टिस’मध्ये रुग्णाला कमी खर्चात औषधे मिळतात, विक्रेत्याच्या औषधे खपतात आणि ‘आयसीयू’तील हेरालाही त्याचा लाभ होतो. औषध विक्रीचा हा नवा ‘ट्रेंड’ सध्या दिसू लागला आहे. 

पुणे- ‘तुमचा पेशंट ‘आयसीयू’मध्ये आहे? त्याची औषधे आमच्याकडून घ्या. आम्ही थेट ४० ते ५० टक्के सवलतीच्या दरात औषध देऊ,’ असे सांगणारा कॉल तुमच्या मोबाईलवर आल्यास आश्‍चर्य वाटून घेऊ नका. कारण औषध विक्रेत्यांनी रुग्णालयांच्या ‘आयसीयू’मध्ये हेर पेरले आहेत. ते तुमचा मोबाईल क्रमांक रुग्णालयाच्या परिसरातील औषध विक्रेत्यांना देतात. या नव्या ‘प्रॅक्‍टिस’मध्ये रुग्णाला कमी खर्चात औषधे मिळतात, विक्रेत्याच्या औषधे खपतात आणि ‘आयसीयू’तील हेरालाही त्याचा लाभ होतो. औषध विक्रीचा हा नवा ‘ट्रेंड’ सध्या दिसू लागला आहे. 

तुमचा रुग्ण ‘आयसीयू’मध्ये दाखल झाल्यानंतर तेथील डॉक्‍टर तपासणी करून काही वैद्यकीय चाचण्या करायला सांगतात. त्याचबरोबर मास्क, ग्लोव्हज अशा सर्जिकल  साहित्यापासून ते अँटिबायोटिक्‍स, सलाईन अशी औषधांची यादी तेथील परिचारिका तुमच्या हातात टेकवते. ही औषधे कुठून घ्यावीत, अशी कोणतीही सूचना परिचारिका किंवा रुग्णालय करत नाही. त्यामुळे जवळच्या रुग्णालयातून औषध आणण्यास प्राधान्य दिले जाते. परंतु त्यानंतर काही तासांमध्येच तुमच्या मोबाईलवर रुग्णालयाच्या परिसरातील औषध दुकानांमधून एकामागून एक कॉल येतात. त्यात आमच्याच दुकानांमधून औषध घेण्यासाठी नातेवाइकांची मनधरणी केली जाते. त्यासाठी ४० ते ५० टक्के सवलतीच्या दरात आम्ही औषधांची विक्री करत असल्याचेही सांगण्यात येते, अशी माहिती समोर आली आहे. 

नातेवाइकांच्या पैशांची बचत
रुग्णालयाशी संलग्न रुग्णालयातून औषध घेतल्यास एकूण बिलावर जेमतेम दहा टक्के सवलत मिळते. दुसऱ्या औषध दुकानांमधून औषधांवर ५० टक्‍क्‍यांपर्यंत सवलत दिली जाते. त्यातून नातेवाइकांचा औषधांचा खर्च कमी होतो. 

मोठी सवलत देणे का शक्‍य?
औषधांच्या किमती (एमआरपी) औषध निर्माण कंपन्यांनी उत्पादन खर्चापेक्षा खूप जास्त पटीने वाढविलेल्या आहेत. त्याची खरेदी किंमत कमी असते. त्यामुळे रुग्णाला औषध देताना ‘एमआरपी’वर ५० टक्‍क्‍यांपर्यंत सवलत देणे विक्रेत्यांना शक्‍य होते. 

औषधांचा खर्च कमी होत असल्याने आलेल्या कॉलला आम्ही प्रतिसाद देतो. औषधाच्या गुणवत्तेतही कोणताही फरक नसल्याचे औषध विक्रेत्यांकडून सांगण्यात येते. डॉक्‍टरांनी लिहून दिलेल्या कंपनीचीच औषधे खरेदी करतो. 
- सागर बोधे, रुग्णाचे नातेवाईक

असा ‘शेअर’ होतो नंबर!
‘आयसीयू’मध्ये रुग्णाच्या नातेवाइकांचा मोबाईल क्रमांक दिलेला असतो. औषध विक्रेत्यांनी ‘आयसीयू’तील काही कर्मचाऱ्यांशी जवळीक साधलेली असते. ते हेर नातेवाइकांचा क्रमांक औषध विक्रेत्यांपर्यंत पोचवितात. त्या आधारावर तुम्हाला थेट औषध विक्रेत्याचा कॉल येतो.

कॅब चालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medicine Tips from the ICU

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: