पुणे : फेसबुकवरून भेटला, विवाह केला अन् थापाड्या निघाला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन हा विवाहित असून, तो आपल्या आईवडीलांसह लोणी येथे राहतो. दरम्यान, एक वर्षापूर्वी सचिन व तरुणीची फेसबुकवरून मैत्री झाली होती. फेसबुकवरुन चॅट करत असताना, दोघांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबर दिले.

लोणी काळभोर : सध्या फेसबुक, व्हाट्‌सअप, इस्टाग्राम सारख्या सोशल नेटवर्किंग साइटवरून बदनामी, फसवणूक आणि धमकी देण्याच्या गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. तरुणांमध्ये फेसबुकचा मोठा वापर होतो. त्यावरून झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर लग्नातही होते. पण त्याचबरोबर फसवणुकीतही होते. असाच फसवणुकीचा प्रकार लोणी काळभोर येथे नुकताच उघडकीस आला. 

लोणी काळभोर येथील एका महाभागाने पहिले लग्न लपवून, पुण्यातील फेसबुक मैत्रीणीशी दुसरे लग्न केले. मात्र लग्नानंतर काही दिवसांनी जोडपे घरी पोचताच फेसबुक मैत्रिणीसमोर पहिल्या लग्नाचे बिंग फुटलेच. बिंग फुटताच फेसबुक मैत्रिणीची समजूत न काढता, तिला वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरवात केली. मात्र संबंधित महाभागाच्या तावडीतून सुटताच, तरुणीने कौटुंबिक हिंसाचाराची व फसवणुकीची फिर्याद दिली. सचिन बाळू कांबळे (रा. साई शांती सोसायटी, लोणी काळभोर) असे गुन्हा दाखल झालेल्या त्या महाभागाचे नाव आहे.

पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन हा विवाहित असून, तो आपल्या आईवडीलांसह लोणी येथे राहतो. दरम्यान, एक वर्षापूर्वी सचिन व तरुणीची फेसबुकवरून मैत्री झाली होती. फेसबुकवरुन चॅट करत असताना, दोघांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबर दिले.

काही दिवसांनी सचिनने फेसबुक मैत्रिणीला प्रत्यक्ष भेटण्यासाठी तगादा लावला. सचिनच्या आग्रहाला बळी पडत, ती भेटायला गेली. दरम्यान, ती भेटीला येताच, पहिल्याच भेटीत सचिनने तिच्याकडे लग्नाचा आग्रह धरला. मात्र तिने घरच्यांशी बोलावे लागेल म्हणून सचिनला नकार दिला. मात्र त्यानंतर काही दिवसातच सचिनने तिच्याशी गोड बोलून आळंदी येथे लग्न केले. लग्नानंतर काही दिवस सचिन व फेसबुक मैत्रीण फुरसुंगी येथे राहिले. मात्र काही दिवसांपूर्वी सचिन लग्न झालेल्या फेसबुक मैत्रिणीला घेऊन लोणी येथील घरी गेला.

काही दिवसातच त्याचे पहिले लग्न झाले असल्याचे फेसबुक मैत्रिणीसमोर आले. फेसबुक मैत्रीण (म्हणजेच दुसऱ्या बायकोने) पहिल्या लग्नाबाबत सचिनकडे विचारणा करताच, त्याने तिला मारहाण करण्यास सुरवात केली. तसेच ही बाब तिच्या आईवडिलांना समजू नये यासाठी तिचा मोबाईलही काढून घेतला. मात्र पंधरा दिवसांपूर्वी तिचे आईवडील तिला भेटण्यासाठी लोणीत आले असता, वरील बाब उघडकीस आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meet on Facebook got married and He cheated