एचए कंपनीसंदर्भात बुधवारी दिल्लीत बैठक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

केंद्रीय रसायनमंत्री सदानंद गौडा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पिंपरी (पुणे) : अनेक वर्षांपासून आजारी असलेल्या केंद्र सरकारच्या हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स (एचए) कंपनीला संजीवनी देऊन पुन्हा तिला कसे पुढे न्यायचे यासंदर्भात येत्या बुधवारी (ता. 6) केंद्रीय रसायनमंत्री सदानंद गौडा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती एचए मजदूर संघाचे अध्यक्ष, खासदार मनोज कोटक यांनी 'सकाळ'ला दिली. नवी दिल्लीत होणाऱ्या या बैठकीला कामगार संघटनेचे प्रतिनिधी, रसायन मंत्रालयाचे अधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत. 

एचए कंपनीच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याला गती देऊन ती पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने कशी चालवता येईल, कंपनीतील कर्मचारी टिकून राहण्यासाठी काय करणे अपेक्षित आहे, या विषयावर चर्चा होईल. कंपनी पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी येथे असणाऱ्या मशिनरीचे अत्याधुनिकरण करण्याचा विचार आहे. त्यानंतर उत्पादन क्षमतेत वाढ होऊ शकते आणि पुढील एक ते दीड वर्षात कंपनीला पुन्हा एकदा नवे वैभव मिळू शकते. त्यामुळे त्यासाठी काय करता येईल, यावर बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. 

दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी कंपनीच्या कामगारांना स्वेच्छानिवृत्ती, थकीत पगाराची रक्‍कम देण्यासाठी केंद्र सरकारकडून 280 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. ही रक्‍कम लवकर मिळावी, यासंदर्भात बोलणी होणार आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची 27 महिन्यांच्या पगाराची रक्‍कम थकली आहे. ही रक्‍कम जमा झाल्यानंतर त्याचे वाटप करण्यात येणार आहे. काही दिवसांत हा प्रश्‍न सुटेल, असा विश्‍वास कोटक यांनी या वेळी व्यक्‍त केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting in Delhi on Wednseday Hindustan antibiotics company