सासवड पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी मंत्रालयात बैठक

श्रीकृष्ण नेवसे
बुधवार, 5 जून 2019

  • सासवड पाणीप्रश्नावर लागणार मार्गी...
  • राज्यमंत्री विजय शिवतारेंचा पुढाकार
  • नगरविकास व पाणी पुरवठा मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद 

सासवड (जि. पुणे) : येथील सासवड (ता. पुरंदर) शहराच्या सध्या उद्भवलेल्या पाणीप्रश्नावरुन काल मुंबईला मंत्रालयात पुरंदरचे लोकप्रतिनिधी तथा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या पुढाकारातून एक तातडीची बैठक झाली. त्यात वीर धरणावरील चारी खोदाई, नवीन वीजपंप बसविणे, सौर उर्जेवर पंप चालविण्याची उपाययोजना नगरविकास व पाणी पुरवठा मंत्र्यांनी मान्य केली. तसेच त्याबाबत त्वरीत प्रस्ताव पालिकेने सादर करण्याचा निर्णय झाला. 

उन्हाळ्यात सासवडचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र होतो. यंदा तर दुष्काळाने पाणीबाणीची परिस्थिती झाली. त्यातून राज्यमंत्री शिवतारे यांनी भाटघर व गुंजवणी धरणाचे वीर धरणात पाणी सोडल्याने परिस्थिती काहीशी सुधारली. मात्र समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी आज मुंबईला मंत्रालयात राज्यमंत्री श्री. शिवतारे यांच्या पुढाकारातून महत्वपूर्ण बैठक झाली. शिवतारे यांच्यासह नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या दालनात आज (ता. 4) पाणी योजना व समस्येवर चर्चा झाली. बैठकीला राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष संजय गणपत जगताप, मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यासह नगरविकास विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

dam   

वीर धरणाशी सासवड पाणीयोजनेचा जॅकवेल आहे. त्याकडे जाणारी चारी ही उथळ असल्याने जॅकवेलमध्ये पाणी जात नाही. त्यामुळे चारी खोल करून लोखंडी पाईपद्वारे पाणी जॅकवेलमध्ये आणण्याची व्यवस्था करावी., असा मुद्दा शिवतारे यांनी मांडला. यावर कार्यवाहीसाठी नगरपालिकेने तसा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिले.

योजनेतील पंप 15 वर्षांपूर्वीचे जुने असल्याने ते नादुरुस्त होतायेत. त्यामुळे हे पंप बदलावेत आणि वीजबिल बचतीसाठी शासनाने अनुदानावरील सौर उर्जा प्रणाली द्यावी, असे शिवतारेंनी सुचविले. त्यावर नगरविकास राज्यमंत्र्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला याबाबतचे अंदाजपत्रक व परिपूर्ण प्रस्ताव तयार करावा आणि त्याची प्रत मुख्यमंत्री, नगरविकास राज्यमंत्री, पाणीपुरवठा मंत्री आणि राज्यमंत्री शिवतारेंना सादर करावी असे निर्देश दिले. भांडवली खर्च शासनाने केल्यास त्याची दुरुस्ती आणि परिचलनाचा खर्च पालिकेने करावा, असे निर्देशही पाटील यांनी दिले.

नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे सासवड शहर मोठ्या प्रमाणात विस्तारेल. त्यामुळे भूमिगत गटर योजनेचा दुसरा टप्पाही लवकरात लवकर कार्यान्वित करावा, अशी सूचना शिवतारेंनी मांडली. त्यावरही सकारात्मक प्रतिसाद पाटील यांनी दिला. 

पाणीपुरवठा मंत्र्यांचाही प्रतिसाद...
नगरविकास राज्यमंत्र्यांनंतर सासवड पाणीप्रश्नी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडेही बैठक पार पडली. सासवड पाणीप्रश्नी अगोदरच्या बैठकीतील मुद्द्यांचा आढावा झाला. तसेच श्री. शिवतारे यांनी सुचविलेल्या सर्व उपाययोजनांच्या अनुषंगाने पाणीपुरवठा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सर्व प्रस्ताव शासनास सादर करेल व कामास गती दिली जाईल., असे लोणीकर यांनी स्पष्ट केले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting in the Ministries office for permanent solution on Saswad Water Issue